नांदेड, दि. ९ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक, ग्रामीण विकास यासह अन्य क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांनी नामनिर्देशन दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नादेडच्या वतीने करण्यात आले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा पुढे नेला आहे. राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला उच्चस्थान मिळवून दिले. प्रखर स्वातंत्र्य सेनानी दूरदृष्टीचे राजकारणी, मुत्सद्दी सुसंस्कृत लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमाणसात चिरंतन आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे निरंतर सुरु राहावा यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली व विभागनिहाय संपूर्ण महाराष्ट्रभर विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. समाजहित डोळ्यासमोर ठेवून राज्यात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नादेडच्या वतीने कृषी, औद्योगिक, समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजित एकात्मता, विज्ञानतंत्रज्ञान, ग्रामीणविकास, मराठी साहित्य संस्कृती, कला क्रिडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात योणार आहे. १५ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच २५ नोव्हेंबर २०१९ रोजी नांदेड येथे एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. पुरस्कारासाठी पुढील निकष पूर्ण करणा-या व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्ती व संस्थेचे वैयक्तीक अर्ज विचारात घेतले जाणार नसून त्यासाठी संबंधित जिल्हा किंवा विभागातील विभागातील लोकप्रतिनिधी, नामांकित संस्था, कुलगुरू, साहित्यिक, संमेलन अध्यक्ष यांची शिफारस असणे आवश्यक आहे. व्यक्ती व संस्थेची संपूर्ण माहिती मराठी मध्ये असावी. सोबत दोन फोटो, कार्याची माहिती, संस्थेचा परिचय, कार्याची ठळक वैशिष्ट्ये, संपर्क आदी तपशील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नांदेड येथे दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवावेत अये आवाहन विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.