
नांदेड ता 30 - यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेडच्या वतीने 'दास्तान-ए -रामजी'चा प्रयोग काल आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई येथील अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून दास्तान सादर केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नारायणराव शिंदे उपस्थित होते. यावेळी दास्तान सादर करण्यासाठी उपस्थित अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचे भारतीय ध्वज प्रतिमा आणि पुस्तकांचा संच देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. नारायणराव शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचा धांडोळा घेत चव्हाण सेंटरच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या दास्तान ए गोईच्या समग्र इतिहासाचा अक्षय शिंपी यांनी धांडोळा घेतला. यानंतर जीवन आणि मृत्यूच्या सत्यावर आधारित असलेल्या दास्तान ए रामजीचा प्रयोग नेहा कुलकर्णी आणि अक्षय शिंपी यांनी ओघवत्या शैलीत सादर केला. प्रयोगाला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने अक्षय शिंपी यांनी नांदेडवासीयांचे व चव्हाण सेंटरचे आभार मानले.
यावेळी नांदेड चव्हाण सेंटरचे सचिव शिवाजी गावंडे, कोषाध्यक्षा कल्पना डोंगळीकर, सदस्य नर्सिंग आठवले, बापू दासरी, दिलीप बाळसकर, मनोहर बसवंते, प्रा संदीप देशमुख, नामदेव दळवी, श्रीनिवास शिंदे, डॉ अनिल देवसरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डॉ श्रीराम गव्हाणे यांनी केले तर आभार शिवाजी अंबुलगेकर यांनी व्यक्त केले.