महत्त्वाचे

गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतर लगेच स्क्रीनवर व्हाट्सअप इन्व्हाईट लिंक दिसेल ती क्लिक करून व्हाट्सअप समूहात सामील व्हावे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे. ‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीद आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे.

शिक्षण विकास मंच

शिक्षणाचा विचार करणारा आणि त्यातून कृतीप्रवण होणारा समाज घडवणे, हे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई कार्यरत आहे. २००८ साली डॉ.कुमुद बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली या मंचाची स्थापन झाली. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर शिक्षण विकास मंचाची वाटचाल सुरु आहे. हा मंच शैक्षणिक प्रश्न, शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक धोरण इत्यादी बाबींच्या अनुषंगाने उत्प्रेरक म्हणून काम करतो. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा.सुप्रियाताई सुळे, शिक्षण विकास मंचच्या निमंत्रक असून डॉ.वसंत काळपांडे मुख्य संयोजक, बसंती रॉय विशेष सल्लागार आणि डॉ.माधव सूर्यवंशी शिक्षण विकास मंचच्या कोअर टीमचे समन्वयक म्हणून जबाबदारी पाहतात. नजमा काझी, ऐनुल आत्तार, पंडित पंडागळे, अजित तिजोरे आणि जयवंत कुलकर्णी हे शिक्षण विकास मंचचे कोअर टीमचे सदस्य आहेत. कोअर टीम आणि शिक्षण विकास मंचशी जोडले गेलेले राज्यभरातील आणि भारताबाहेरीलही सुमारे २०००० सदस्य पूर्णपणे स्वयंसेवी वृत्तीने काम करतात. यात प्राथमिक, माध्यमिक, आणि महाविद्यालयीन शिक्षक, शाळांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण प्रेमी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. शिक्षण विकास मंचाच्या माध्यमातून प्रामुख्याने शिक्षण कट्टा, शैक्षणिक साहित्य पुरस्कार, ग्रंथ निर्मिती आणि ग्रंथ पुरस्कार, शिक्षण साहित्य संमेलन, व्याख्याने, पालक मेळावे, दत्तक शाळा योजना तसेच शिक्षकांसाठी प्रशिक्षणे आणि कार्यशाळा इत्यादी उपक्रम राबवले जातात. दरवर्षी आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम म्हणजे वार्षिक शिक्षण परिषदा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये प्रत्यक्षात शिक्षण परिषद घेणे शक्य झाले नाही. तथापि ऑंनलाइन पद्धतीने ‘देशोदेशीचे शिक्षण’ आणि इतर विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते तसेच ‘१०० दिवसात १० वी’ या अकराव्या शिक्षण परिषदेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल झाले असल्याने आपण प्रत्यक्षात परिषदेचे आयोजन करत आहोत. शिक्षण विकास मंचने आजअखेर विविध विषयांवर अकरा वार्षिक शिक्षण परिषदा आयोजित केल्या आहेत. ही बारावी वार्षिक शिक्षण परिषद.

बारावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद २०२२

यावर्षी ‘द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. आजमितीला महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या ६१००० प्राथमिक शाळांपैकी जवळपास ३८००० शाळा दोन शिक्षकी आहेत. या दोन शिक्षकी शाळा प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर आणि अगदी छोट्या गावांत आहेत. या शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याकारणाने त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत, म्हणून बंद करण्याची चर्चा अधून मधून होत असते. तथापि या दोन शिक्षकी शाळा अत्यंत प्रभावीपणे काम करताना आणि विद्यार्थी घडवताना दिसत आहेत. त्यामुळे या शाळा बंद न पडता त्यांचे सक्षमीकरण व्हावे, आणि त्या अनुषंगाने पालक आणि शिक्षक यांची मनोभूमिका, शासनाची भूमिका, इत्यादी गोष्टींवर विचारमंथन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

परिषदेत सहभागी होणारे प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे राज्य आणि जिल्हा स्तरावर काम करणारे अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पालक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, शिक्षण प्रेमी नागरिक.

‘द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ शैक्षणिक परिषद

सोमवार दिनांक ०२ मे २०२२

कार्यक्रम पत्रिका

चहा आणि नाश्ता: सकाळी ९:०० ते ९:३०

नोंदणी: सकाळी ९:३० ते १०:१५

सत्र १: उद्घाटन

सकाळी १०:१५ ते १२:१५

स्वागत– मा.सुप्रियाताई सुळे
  • प्रास्ताविक– बसंती रॉय
  • डॉ. वसंत काळपांडे लिखित ‘शालेय प्रशासन आणि मानवी संबंध’ पुस्तक परिचय– योगेश कुदळे
  • ‘शालेय प्रशासन आणि मानवी संबंध’– पुस्तक प्रकाशन समारंभ- हस्ते डॉ.अनिल काकोडकर
  • लेखकाचे मनोगत- डॉ. वसंत काळपांडे
  • उद्घाटनपर भाषण– डॉ. अनिल काकोडकर
  • आभार– डॉ. माधव सूर्यवंशी
  • बीजभाषण–मा.विवेक सावंत
सत्र २: चर्चासत्र

दुपारी १२:१५ ते १:३०

  • डॉ. नेहा बेलसरे, उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
  • सुनील कुऱ्हाडे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
  • रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद
  • रामकृष्ण वाटेकर, द्विशिक्षकी शाळेचे शिक्षक, पुणे जिल्हा परिषद
  • संपत टेमगिरे, द्विशिक्षकी शाळेचे पालक, पुणे जिल्हा परिषद
भोजन अवकाश: दुपारी १:३० ते २:३०

 

सत्र ३: खुली चर्चा

दुपारी २:३० ते ०३.३०

सत्र ४: समारोप

दुपारी ३:३० ते ५:००

  • परिषदेचा आढावा– बसंती रॉय
  • प्रस्तावना– मा.सुप्रियाताई सुळे
  • मा.ना.प्रा.वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मनोगत
  • आभार प्रदर्शन- अजित तिजोरे
चहा ५:०० ते ५:३०

 

अधिक माहितीसाठी संपर्क:

योगेश कुदळे- 9370799791
(क्षेत्र समन्वयक, शिक्षण विकास मंच)

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
यशवंतराव चव्हाण सेंटर [ मध्यवर्ती कार्यालय ]
दिनांक : 
02 मे 2022
वेळ : 
09:00
ते
05:30
ठिकाण : 
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१