छत्रपती संभाजीनगर - उर्दूमधील दास्तान वाचल्या होत्या, अनुभवल्या होत्या आणि त्यामध्ये रंगून गेलो होतो. आज प्रत्यक्षात अक्षय शिंपी व नेहा कुलकर्णी यांच्या अभिनयातून ही दास्तान अनुभवायला मिळाली, याचा मनस्वी आनंद झाल्याची भावना गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी यावेळी व्यक्त केली.
अक्षय शिंपी यांच्या एकल कथा आणि तदनुषंगिक अभंगांचे मिश्रण असलेला ‘दास्तान - ए - रामजी’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छञपती संभाजीनगर आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्यावतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात यशस्वीपणे संपन्न झाला. यावेळी श्री.पांचाळे बोलत होते.
यावेळी चव्हाण सेंटर जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,नीलेश राऊत, एम.जी.एम.रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रेरणा दळवी, डॉ.आनंद निकाळजे,शिव कदम, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव व सर्व संबंधित उपस्थित होते.
श्री.पांचाळे म्हणाले, या दास्तानचे विशुद्ध आणि मनोज्ञ रूप असे होते की आपला श्वासही आपल्याला ऐकू येत होता. अतिशय सुंदरपणे हे सादरीकरण अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी केलेले आहे. माझी भावना व्यक्त करीत असताना मला एक शेर आठवला तो असा की, “ देख ना सकते थे तो दरिया भी था कतरा, आंख खुली तो कतरा भी दरिया नजर आया” |
दास्तानगोई हा उर्दूमधील पारंपरिक कथाकथनाचा प्रकार मराठीत आणण्याच्या आमच्या प्रयोगाला छत्रपती संभाजीनगरकरांनी उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार मानतो. हा प्रयोग अगदी घरापासून, शेती, व्याख्यानमाला ते सुसज्ज सभागृहात सादर करता येतो. आज रसिक श्रोत्यांनी दास्तानला उपस्थित राहत याचा आनंद घेतला. आता ही दास्तान तुमची झाली, असे श्री. शिंपी यावेळी म्हणाले.
दास्तानगोई हा उर्दूमधील पारंपरिक कथाकथनाचा प्रकार एकाच विषयाच्या धाग्यात विणलेले छोटे-छोटे किस्से, कथा, कविता असलेल्या ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ या पहिल्या कार्यक्रमाद्वारे दास्तानगोई हा प्रकार अक्षय शिंपी यांनी मराठीत आणला. अक्षय शिंपी हे गेली अनेक वर्षे अभिनय आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.