औरंगाबाद (दि.२५) : साहित्य प्रसृतीमागे वेदनांची कळा असते. माणूसपण जाणून घेण्याचा प्रवास विशिष्ट कळ, वेदनांमधून अंतरंगापर्यंत घडल्याशिवाय साहित्य प्रसृत होत नाही.काटा टोचलेला दिसतो पण टोचणाऱ्याची कळही मांडता आली पाहिजे.एखादे गाव वसते त्याला कित्येक वर्षे लागलेली असतात. पण एखाद्या गावचे विस्थापन जेव्हा होते, तेव्हा तेथील सांस्कृतिक संचितही लोप पावत असते,अशा संवादातून दोन लेखकांचा लेखन प्रवास गुरुवारी उलगडून दाखवण्यात आला.
निमित्त होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आइन्स्टाइन सभागृहात "संवाद-दोन लेखकांशी" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी साहित्यिक -कवी संदीप जगदाळे, कवी-कादंबरीकार रमेश रावळकर यांना त्यांच्या लेखनप्रवासाविषयी पत्रकार प्रशांत पवार यांनी बोलते केले. या प्रसंगी विभागीय केंद्राचे कोषाध्यक्ष अंकुशराव कदम, प्राचार्या डॉ. रेखा शेळके,केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुबोध जाधव,ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर,डॉ.गणेश मोहिते,डॉ.ह.नि.सोनकांबळे, डॉ.आशा माने-देशपांडे, डॉ. अशोक नाईकवाडे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला रावळकर यांच्याशी पवार यांनी संवाद साधला. आत्महत्या करायला निघालेला कवी ते टिश्यूपेपरचा कादंबरीकार या प्रश्नावर उत्तर देतांना रावळकर म्हणाले, शेतकरी कुटुंबातील हालाखीच जीवन मी जगत होतो. शहरात जावून काहीतरी केल पाहिजे म्हणून औरंगाबाद शहरात पळून आलो. वेटर म्हणून कामही केल. बाप म्हणून आणि पती म्हणून मी काहीच देवू शकत नाही. आता शेवट बरा.जातांना शिक्षण संचालक, रेशन न देणारा दुकानदार याला जबाबदार असे लिहून समाजमाध्यमावर पोस्ट टाकली. पण त्या पूर्वी पी.विठ्ठल, कैलाश अंभुरे या मित्रांना भेटलो. त्यांनी समजावल आधार दिला. या सर्वांमध्ये मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून मी बाहेर पडलो. त्यातून हे टिश्यू पेपर आता प्रेरणा देत आहे. प्राध्यापक म्हणून काम मिळाले आहे. त्या सर्व नकारात्मक विचारातून आपण बाहेर पडल्याचे रावळकर म्हणाले. या टिश्यूपेपरने मला ओळख दिली. भारतभर हे पुस्तक राजहंस प्रकाशन आणि श्याम देशपांडे यांच्यामुळे पोहचले. आता यावर वेबसिरीज येणार आहे. असेही रावळकर यांनी सांगितले. तर आयुष्य खाच खळग्यांनी भरलेलं असलं तरी हार मानू नका. नैराश्य काही काळापूरते असतं,प्रयत्न करत रहा असा संदेशही रावळकर यांनी दिला.
यानंतर पैठण येथील कवी जगदाळे यांच्याशी पवार यांनी संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांच्या माध्यमातून पवार यांनी जगदाळे यांना त्यांच्या लेखन प्रवासाविषयी बोलते केले. जगदाळे म्हणाले, एखादे गाव वसण्यासाठी हजारो वर्ष लागतात. पण काही दिवसात विस्थापितही होतात. एखादे गाव विस्थापित होण्यातून तेथील सांस्कतिक संचितही लोपते. यावेळी कृषी विधेयक बिल मागे घेण्याविषयी विचारले असता चांगला निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. असेही जगदाळे म्हणाले.यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर कवीताही सादर केली. प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले. आभार डॉ.जिजा शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुबोध,निखिल भालेराव,सचिन दाभाडे,उदय भोसले ,रोहन देशपांडे,प्रदीप धाडगे,प्रतीक राऊत आदींनी परिश्रम घेतले.