भारतीय संविधानातील कर्तव्य, अधिकार आणि मूल्ये यांची रूजवणूक शालेय वयात होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या विषायापुरते संविधान शिक्षण मर्यादित न ठेवता, शिक्षकांनी सर्वच शालेय विषय शिकवताना त्याचा समन्वय भारतीय संविधानाशी साधावा, असे प्रतिपादन भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ ह.नि. सोनकांबळे शिक्षण कट्ट्यात केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी आईन्स्टाईन सभागृहात आयोजित "शालेय शिक्षण आणि भारतीय संविधान" या विषयावर आयोजित शिक्षण कट्टा कार्यक्रमात डॉ. सोनकांबळे बोलत होते. या शिक्षण कट्ट्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर हे होते. व्यासपीठावर वैशाली बावस्कर, सुबोध जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. सोनकांबळे पुढे म्हणाले की, उद्याचे उत्तम आणि सजग भारतीय नागरिक घडवायचे असतील तर आज शालेय वयात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भारतीय संविधानाचे मूल्य रुजविणे आवश्यक आहे आणि हे काम शाळा आणि शिक्षकच प्रभावीपणे करू शकतात.
या शिक्षक कट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संविधानाचे मूल्य रुजविण्यासाठी शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची चर्चा यावेळी झाली. डॉ सोनकांबळे यांनी शाळेमध्ये 'संविधान फलक ' उपक्रम राबवावा असे सुचविले. या फलकावर विद्यार्थ्यांनी संविधाना वरील त्यांच्या शब्दांत केलेले लेखन प्रसिध्द करून शाळेतील सर्व विद्यार्थ्याना वाचनासाठी उपलब्ध करून द्यावेत असे सुचविले. विनोद सिनकर यांनी भाषेचे शिक्षक विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखन उपक्रम घेतात त्यात भारतीय संविधानाचे कलमे, नियम यांचे लेखन विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल असे सुचविले. मुख्याध्यापक विजय पाटोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संविधान सभा,कायदे मंडळ यांची रचना समजावून दिली तर ते अधिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यापर्यंत पोहचविता येईल असे सुचविले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रमेश ठाकूर म्हणाले की, जगातील कोणत्याही समस्येचे मूळ हे शालेय शिक्षणात सापडते. भारतीय संविधान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संविधानातील बाबींचा संबंध हा दैनंदिन जीवनाशी जोडला जावा. नागरिकशास्त्र हा विषय फक्त परीक्षेतील गुणाभोवती केंद्रीत न करता विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या कृतीतून दिसायला हवा तर भारतीय संविधानाचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घ काळ टिकून राहतील.
डॉ. रूपेश मोरे यांनी या कट्ट्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले तर वैशाली बावस्कर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक वसंत काळपांडे, जिल्हा केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी राजेंद्र वाळके,डॉ प्रकाश खेत्री, नारायण लवांडे, बद्रीनाथ थोरात, सुरेश परदेशी, रोहिणी माळी,गोविंद गायकवाड, भारत चव्हाण, अरुण ठाकरे, विष्णू देवरे, दिलीप वाढे,अरुण माने, ढवळू बहिरम, किशोर नरवडे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती होती. ऑनलाईन झूमच्या माध्यमातून राज्यभरातून अभ्यासक, शिक्षक या शिक्षण कट्टा कार्यक्रमात सहभागी झाले होते.