ललित लेखन हा वाङमय प्रकार नसून त्याला स्वतंत्र रुप आहे. स्वैर, सैल असला तरी त्यांच्याअंतर्गत तेवढीच संगती असते. ललित लेख हा लेखकाच्या विचार प्रवाहाची अभिव्यक्ती आहे. दासू वैद्य यांना ‘ मेळा ’ मध्ये काव्याची भाषा बाजूला ठेवून लालित्यपूर्ण लेखन केले आहे. त्यामुळे काव्य आणि गद्य या दोन्ही प्रकारांत त्यांचे तेवढेच प्रभुत्व दिसून येते, असे प्रतिपादन डॉ. सुधीर रसाळ यांनी केले. यशवं तराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन आणि महात्मा गांधी मिशनतर्फे रविवारी (दि. ४) रुक्मिणी सभागृहात दासू वेद्य लिखित ‘ मेळा ’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन डॉ. रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय केंद्राचे अध्यक्ष तथा एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कवी सौमित्र, अस्मिता मोहिते, मुस्तजीब खान, शिव कदम, अभिजित झुंजारराव यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. डॉ. रसाळ म्हणाले, दासू हे कृषी संस्कृतीतून घडलेले व्यक्तिमत्व असून, त्यांनी ‘ मेळा ’ च्या माध्यमातून आधुनिक जगाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या भावनिक पातळ्यांवर लेखन नेणे हे दासूंचे वैशिष्ट्ये असून, पुस्तकांत त्यांनी विलक्षण सांस्कृतिक प्रतिमा वापरून तटस्थपणे लेखन केले आहे. यावेळी सौमित्र यांनी ‘ मेळा ’ मधील विजय तेंडुलकरांना लिहिलेल्या पत्राच्या लेखाचे अभिवाचन केले. मुस्तजीब खान यांनी दासूंचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. कवितेत पकडता न आलेले अनुभव ललित लेखस्वरूपात मांडले असून, ‘ मेळा ’ हा तर विषय आणि अनुभवांचा गोपालकालाच आहे, असे मनोगत दासू यांनी व्यक्त केले. नाट्याविष्काराला रसिकांची दाद - प्रकाशन सोहळ्यानंतर ‘ कुठच काही जळत नाहीये ’ हा दासू वैद्य यांच्या ललित लेख व कवितांवर आधिरित नाट्याविष्काराचा कार्यक्रम सादर करण्यात आला. - दिग्दर्शन, नेपथ्य प्रकाश योजना अभिजित झुंजारराव यांची होती. राहुल शिरसाट, निखिल खाडे, संकेत जाधव, राजस पंधे, सोनाली मगर, सायली शिंदे, ऋचिका खैरनार या कलाकारांचा यात सहभाग होता. आणि ओंकार जाधव यांचे संगीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राचे सचिव नीलेश राऊत, सुबोध जाधव, गणेश घुले, मंगेश निरंतर, दीपक जाधव, गिरीश जोशी, श्रीराम पोतदार, स्वप्नील जोशी, उमेश राऊत, निखिल भालेराव, राजेंद्र वाळके, डॉ.रुपेश मोरे, श्रीकांत देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.