
दास्तानगोई हा उर्दूमधील पारंपरिक कथाकथनाचा प्रकार. एकाच विषयाच्या धाग्यात विणलेले छोटे-छोटे किस्से, कथा, कविता असलेल्या “दास्तान-ए-बड़ी बांका” या पहिल्या कार्यक्रमद्वारे त दास्तानगोई हा प्रकार अक्षय शिंपी यांनी मराठीत आणला. अक्षय शिंपी हे गेली अनेक वर्षे अभिनय आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.
त्यांचा एकल कथा आणि तदनुषंगिक अभंगांचे मिश्रण असलेला ‘‘दास्तान -ए -रामजी’’ हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर व एमजीएम विद्यापीठ यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. २८ जून २०२३ रोजी सायं. ७ वा. रुक्मिणी सभागृह ,एमजीएम कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
उपजें तें नाशें। नाशिलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसे। परिभ्रमे गा अर्थात जन्म-मृत्यू या अटळ घटना. जे जन्म घेतं ते लयाला जाणार, हा सृष्टीनियम. या दोन टोकांत आयुष्याचा लंबक हलत रहातो. जन्म हीच केवळ सुरूवात नसते. मृत्यूही नव्या सृजनाच्या शक्यतेला जन्म देतोच. एक जीव जातो आणि एक जीव जन्माला येतो हे अविरत रहाटगाडगे चालूच राहते. मृत्यूमुळेच जगणं प्रवाही रहातं. हे अधोरेखित करणारी दि. बा. मोकाशी यांची कथा दास्तांगो अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी ही दास्तानगोई आपल्या अभिनयाने विविध व्यक्तिरेखा, विविध भावभावना आपल्या समोर जिवंत करून आपल्या समोर सादर करणार आहेत.
कार्यक्रमात निशुल्क प्रवेश असून रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर चे अध्यक्ष अंकुशराव कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ,सचिन मुळे,नीलेश राऊत,डॉ.अपर्णा कक्कड,कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, डॉ.रेखा शेळके, प्रेरणा दळवी, डॉ आनंद निकाळजे, डॉ.कैलास अंभुरे, शिव कदम, सुहास तेंडुलकर, सुबोध जाधव आदींनी केले आहे.