छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : शेतकरी, शेती, त्याचे पीक हे नजरेसमोर ठेऊन ना.धों. महानोर आपले लिखाण करीत असत. महानोर यांनी शेती, काव्य, साहित्य क्षेत्रात जे प्रचंड योगदान दिलेले आहे, ते कधीही विसरले जाणार नाही, असे प्रतिपादन खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.
मराठी साहित्यातील महान कवी व गीतकार, पद्मश्री ना. धों.महानोर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी शहरातील विविध संस्थांच्या वतीने आयोजित ' पक्षी दूर देशी गेलं ' हा काव्य आदरांजली कार्यक्रम एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. यावेळी, श्री.पवार बोलत होते.
श्री.पवार म्हणाले, शेतीबद्दलची महानोर यांना प्रचंड आस्था होती. विशेषतः शेतीच्या प्रश्नांची त्यांना जाण आणि त्याबद्दल त्यांचा अभ्यास होता. जलसंधारण नीती याबद्दल ते अत्यंत परखडपणे भूमिका मांडत असत. शेतीमध्ये जे नवीन बदल होत आहेत, जे काही नवीन संशोधन येत आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या जीवनावर होत आहे, याच्यावर त्यांचे अधिक लक्ष होते.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात ना.धों. महानोर यांनी १२ वर्ष काम केले असून या काळात त्यांनी जी भाषणे केलेली आहेत, ती सर्व भाषणे विधिमंडळात येणाऱ्या नव्या सदस्यांना मार्गदर्शक अशीच आहेत. विधिमंडळात ते तासंतास बोलायचे आणि सभापतीपती कोणीही असले तरी त्यांनी महानोर यांना वेळेची मर्यादा कधी आणली नाही. ते अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण विषय मांडायचे. नवीन सदस्यांनी त्यांची भाषणे वाचली पाहिजेत, असे श्री.पवार यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या कविता व गीतांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध कवी दासू वैद्य, प्रकाश होळकर (लासलगाव), संजीवनी तडेगावकर (जालना) व शिव कदम हे महानोर यांनी कवितांचे वाचन केले तर प्रसिद्ध गायक राहुल खरे व मालविका दीक्षित (पुणे) यांनी महानोर यांच्या रचलेल्या गीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे निवेदन समाधान इंगळे यांनी केले.
या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर, मराठी विभाग - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा आर्ट, कल्चर व फिल्म फाऊंडेशन, अभ्युदय फाऊंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या आदरांजली कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कौतिकराव ठाले पाटील, बाबा भांड, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार, नीलेश राऊत व सर्व संबंधित उपस्थित होते.