औरंगाबाद : “अक्षरांच्या साह्यांनी, काना मात्रा वेलाट्यांनी मर्हाटीचा टिळा मी लाविला, जिवापाड जपू माय मराठीला” या कवयित्री प्रिया धारूरकर यांच्या लावणीला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. मराठी भाषा दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व नाथरंग प्रस्तुत एमजीएमच्या आईनस्टाईन सभागृहात ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ हा काव्य सांगितिक कार्यक्रम नूकताच संपन्न झाला. मराठी भाषेचा आजपर्यंतचा प्रवास, गीत, भजन, लावणी, पोवाडा अशा विविधांगाने उलगडण्यात आला. ‘मधुर भाषिनी अमृतवाणी वंदन करिते तुला...’ असे वंदन गीत सौख्यदा देशपांडे यांनी सादर करून काव्य सांगीतिक कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रिया धारूरकर यांनी कुसुमाग्रज यांची ‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा’ हे काव्य सादर केले. आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून ते आजमितीपर्यंतचे काही निवडक काव्य, गीत वाचून दाखवीत त्यांनी या मैफलीत रंगत आणली. यावेळी कुसुमाग्रज, सुरेश भट, माधव ज्युलियन, ना. गो. नांदापूरकर अशा साहित्यिक, कवींच्या कविता, गीत संगीताच्या तालावर सुरेखपणे मांडल्या. बहिणाबाईंच्या ओवीही सर्वांना आनंदित करून गेल्या. ‘अवनीत हिंदवी राष्ट्रां, त्याचे उत्कृष्ट, महावैशिष्ट्य... नांदवी तीच माय मराठी’ हा शाहीरमहर्षी आत्माराम पाटील यांचा पोवाडा अजिंक्य लिंगायत यांनी सादर करीत सर्वांची दाद मिळविली. अखेरीस मेणबत्तीच्या उजाळ्यात ‘मी मराठी बोलतो, लिहितो आणि वाचतो, याचा मला अभिमान व स्वाभिमान आहे’ ही प्रतिज्ञा सर्वांनी म्हटली. प्राचार्या रेखा शेळके अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी श्रीकांत देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, काव्य रसिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.