दि.१७ (औरंगाबाद): औरंगाबादकर सिनेरसिकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या चित्रपट चावडीला कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे काही महिन्यांसाठी थांबवावे लागले होते,परंतु आता निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने या रविवारी दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपट चावडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.संध्याकाळी सहा वाजता 'व्ही.शांताराम प्रेक्षागृह',एमजीएम कॅम्पस,औरंगाबाद येथे चावडी संपन्न होईल.
यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय व एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीचे मागील बारा वर्षांपासून शहरात मासिक आयोजन करण्यात येते.
यावेळी 'द ट्रायल ऑफ द शिकागो 7' हा २०२० साली प्रदर्शित झालेला बहुचर्चित अमेरिकन चित्रपट दाखविला जाणार आहे.हा चित्रपट १९६८ च्या डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये शिकागोमधील प्रति-सांस्कृतिक निषेधामुळे उद्भवलेल्या तसेच फेडरल सरकारने षड्यंत्र आणि आणखी काही आरोप केलेल्या सात प्रतिवादींच्या कुप्रसिद्ध खटल्यांवर आधारित आहे.यात तत्कालीन राजकारण व त्याचा अमेरिकेवर झालेला परिणाम दाखवण्यात अतिशय रंजकपणे दाखविण्यात आलेला असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपट चावडी अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी खुली असून या चित्रपटाचा सिनेरसिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे