महोत्सवात यंदा प्रथमच स्पर्धा विभागाचा समावेश,जगभरातील २८ फिल्म्सचे होणार प्रदर्शन औरंगाबाद : जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून दि. १८ ते २१ जानेवारी २०१८ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. सारा बिल्डर्स, पैठण मेगा फुड पार्क प्रा. लि., महाराष्ट्र पर्यटन महामंडळ (एमटीडीसी), प्राईड व्हेंचर्स, विट्स हॉटेल हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. रेडिओ एमजीएम 90.8 हे या फेस्टिव्हलचे रेडिओ पार्टनर आहेत. औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजनामागील उद्देश : सध्याच्या काळातील व इतिहासातील जगातील व भारतातील सवोत्त्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतीक पातळीवर पोहोचावे, औरंगाबाद शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यपटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे. भारतीय सिनेमा स्पर्धा : महोत्सवाच्या चार दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यंदाचा महोत्सव मागील महोत्सवांपेक्षा वेगळा असणार असून यंदाचे आकर्षण म्हणजे महोत्सवात पहिल्यांदाच स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे पारितोषीक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषीकांचा देखील समावेश असणार आहे. ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व तज्ज्ञ विकास देसाई (मुंबई) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रा. एमी कॅटलीन (विभागप्रमुख, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलीस, अमेरीका), चित्रपट अभ्यासक, समीक्षक सैबल चॅटर्जी (दिल्ली), नाटककार - पटकथाकार प्रा. अजीत दळवी (औरंगाबाद), चित्रपट अभ्यासक सुजाता कांगो (औरंगाबाद) हे मान्यवर असणार आहेत. उद्घाटन सोहळा : फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. 18 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार असून या प्रसंगी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ‘रुख’ हा मनोज वाजपेयी अभिनीत व अतनु मुखर्जी दिग्दर्शित बहुचर्चित हिंदी सिनेमा फेस्टिव्हलची ओपनींग फिल्म असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक अतनु मुखर्जी या प्रसंगी प्रेक्षकांसोबत संवाद साधतील. समारोप सोहळा व जीवन गौरव पुरस्कार : फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. 21 जानेवारी 2018 रोजी सायं. सात वाजता संपन्न होणार असून याच सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक पद्मविभूषण अदुर गोपालकृष्ण्न यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने अदुर गोपालकृष्ण्न यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. मास्टर क्लास व विशेष परिसंवाद : महोत्सवाच्या चार दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये शुक्रवार, दि. 19 जानेवारी रोजी आयनॉक्स थिएटर येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता हे निवडक चित्रपट अभ्यासक विद्यार्थ्यांसमवेत मास्टर क्लासच्या माध्यमातून संवाद साधनार आहेत. शाहिद, सिटीलाईट व अलिगढ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलेले आहे. शनिवार, दि. 20 जानेवारी रोजी सायं. पाच वाजता ‘मराठी चित्रपट व जागतिक व्यासपीठ’ या विषयावरील विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले असून या परिसंवादात प्रसिद्ध सिनेनाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ‘श्वास’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत, ‘सीआरडी’ या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक क्रांती कानडे, राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि लेखक-दिग्दर्शक मिलिंद लेले हे सहभागी होणार आहेत. कलाकारांची उपस्थिती व संवाद : स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या खेळानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या महोत्सवादरम्यान ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री इरावती हर्षे, अभिनेता मंगेश देसाई, उपेंद्र लिमये, अलोक राजवाडे, प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता, चित्रपट दिग्दर्शक गिरीश मोहिते, पटकथाकार संध्या गोखले आदी चित्रपट सृष्टीतील नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत. विशेष पोस्टर प्रदर्शन : महोत्सवादरम्यान अभिनेते, निर्माते शशीकपूर यांना आदरांजली म्हणून त्यांच्या पन्नास चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन प्रोझोन मॉलमध्ये पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियातर्फे मांडण्यात येणार आहे. यात एक स्वतंत्र दालन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या पोस्टर्सचे देखिल असणार आहे. चित्रपट रसग्रहन कार्यशाळा : फिल्म फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता औरंगाबाद शहरात दहा महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन प्रसिद्ध चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे. प्रतिनिधी नोंदणी : फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे औरंगाबादच्या रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ तीनशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दिडशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. सहा जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 3) विशाल ऑप्टिकल्स, निराला बाजार 4) महात्मा गांधी भवन, शासकीय ग्रंथालयाशेजारी, समर्थ नगर 5) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 6) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 7) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 8) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल. संयोजन समिती : औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्रसिद्ध चित्रपट समीक्षक व दिग्दर्शक तसेच महोत्सवाचे संचालक अशोक राणे, संयोजन समितीचे सचिव व प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, उद्योजक उल्हास गवळी, सतीश कागलीवाल, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. श्रीरंग देशपांडे, महोत्सव निमंत्रक नीलेश राऊत, महोत्सव समन्वयक शिवदर्शन कदम, जयप्रद देसाई, संतोष जोशी, शिव फाळके, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारूकी, डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. दासू वैद्य, प्रा. मुस्तजीब खान, विजय कान्हेकर, सुनील किर्दक, सुहास तेंडूलकर, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव, डॉ. संदीप शिसोदे, डॉ. आनंद निकाळजे, किशोर निकम, साकेत भांड, अनिलकुमार साळवे, प्रिया धारूरकर, मंगेश मर्ढेकर, गणेश घुले, मंगेश निरंतर, निखील भालेराव, मयुर देशपांडे, श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार, रेणुका कड आदींनी केले आहे.