यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत १६वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद 'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०: मूल्यांकनाच्या नव्या दिशा' या विषयावर उत्साहात पार पडली. परिषदेत मार्गदर्शन करताना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी ‘गुण देणे म्हणजे मूल्यांकन नसून विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा आणि सर्वांगीण विकासाचा प्रवास समजून घेणे म्हणजे मूल्यांकन होय’ असा विचार मांडत विद्यार्थ्यांवरील स्पर्धेचा ताण कमी करण्याचे आवाहन केले. बीजभाषणात एमकेसीएलचे मुख्य मेंटॉर विवेक सावंत यांनी 'गुण हेच ध्येय ठरते तेव्हा शिक्षणाचा मूक बळी जातो' असे स्पष्ट करत NEP २०२० नुसार मूल्यमापन ही निरंतर चालणारी बहुआयामी प्रक्रिया असल्याचे अधोरेखित केले.
या परिषदेत किशोर भागवत व विजया किरमीरवार यांना 'डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार', तर रती भोसेकर यांच्या 'बालशिक्षण-एक अद्भुत सफर' या पुस्तकास उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय डॉ. मिलिंद नाईक, डॉ. विशाल पाजणकर व डॉ. राजेंद्र मोरे यांनी मूल्यांकनाचे आधुनिक प्रयोग आणि 'PARAKH' प्रणालीचे विश्लेषण सादर केले. राज्यभरातील शिक्षक, अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या उपस्थितीत खुल्या चर्चासत्रासह ही परिषद शिक्षण व्यवस्थेतील मूल्यमापन पद्धतीला नवी दिशा देणारी ठरली.




