उल्का महाजन
यशस्विनी उद्योजिका सन्मान
पुणे
2024
उल्का महाजन यांनी १९८८ मध्ये मुंबई विद्यापीठातून MSW ही पदव्युत्तर पदवी पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात १९९० मध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वहारा जन आंदोलनाच्या स्थापनेपासून झाली. त्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढल्या. शोषित जन आंदोलन, रोजगार हमी योजना, नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली तसेच भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्रच्या समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
आदिवासी, दलित, महिला आणि भूमिहीनांच्या जमीन, पाणी, रोजगार आणि अन्न सुरक्षेसाठी त्यांनी अनेक यशस्वी लढे उभारले. विशेषतः स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांविरोधात त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणले. भारत जोडो अभियानातून त्यांनी निवडणुकांमध्ये जनसंघटनांच्या हस्तक्षेपाचे नाविन्यपूर्ण प्रयोग केले.
उल्का यांना ३५ हून अधिक पुरस्कार मिळाले, यात १९९५ चा बिजिंग महिला परिषदेतील युनिफेमचा Future Leader Award आणि मुंबई विद्यापीठाच्या १५० वैशिष्ट्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत समावेश आहे. पण २०२२ मध्ये त्यांनी एका प्रतिष्ठित आणि आघाडीच्या वृत्तवाहिनीचा पुरस्कार नाकारला; कारण त्या म्हणाल्या, "लोकशाही आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या सरकारच्या हस्ते सन्मान स्वीकारणे माझ्या तत्त्वांना मान्य नाही." त्यांच्या या बाणेदार आणि लढाऊ वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
त्यांनी कोसळता गावगाडा आणि एक विजयी लढा: बलाढ्य कॉर्पोरेटविरोधात ही पुस्तके लिहिली, तसेच अनेक लेख आणि पुस्तिका प्रकाशित केल्या, ज्यांचे जर्मन भाषेत अनुवादही झाले आहेत.
आदिवासी, दलित, महिला, शेतमजूर, भूमिहीन इत्यादी वंचित व असंघटित श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या उल्काताई महाजन यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान २०२५’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.