राजश्री गागरे

यशस्विनी उद्योजिका सन्मान
पुणे
2024

लग्न झालेले होते. इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झालेले होते. सुशिक्षित असून देखील बेरोजगारीचे आयुष्य राजश्री ताई गावाकडे जगत होत्या. समोर कोणताच मार्ग दिसत नव्हता. त्यांच्या पतीला नोकरीसाठी भोसरी, पुणे येथून बोलावणे आले आणि आशा पल्लवित झाल्या. त्यांच्या पतीने काही काल नोकरी केली व त्यानंतर स्वत:चा व्यवसाय उभा केला. भोसरी सारख्या उद्योग नगरीमध्ये बायकांचे संघटन करून लघुउद्योजक महिला बचत गट स्थापन केला. संसार सांभाळत पतीच्या व्यवसायात देखील त्या मदत करू लागल्या. परंतु स्वत:चे अस्तित्व काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.

अशातच एक जर्मन व्यवस्थापन असलेली आजारी कंपनी हस्तांतरित करण्याची संधी उपलब्ध झाली. आशिया खंडातील चुंबक बनविणारी पहिली कंपनी ‘म्याग्णालास्ट टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ राजश्री ताईंनी हाती घेतली. वर्षाला दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल आजच्या घडीला ही कंपनी करत आहे. जवळपास १२० पेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. त्यामध्ये पन्नास टक्के महिला कामगार आहेत. एवढी संकटे येऊन देखील आजच्या घडीला एवढी मोठी कंपनी झाली आहे, याबद्दल तुमच्या काय भावना आहेत असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात, “स्वत:चा संसार सांभाळता सांभाळता कंपनीचा संसार देखील विस्तारत गेला. मी स्वत: तर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेच परंतु त्याचबरोबर अनेक महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, याचे मला समाधान आहे.”

महिला सक्षमीकरणासाठी २०१८ साली त्यांनी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली. आज घडीला १८०० पेक्षा जास्त सदस्य या संस्थेचे आहेत.

त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जे आर डी टाटा उद्योग सखी पुरस्कार, दि प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार, सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

उद्योजिका राजश्री नागरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.