श्रद्धा नलमवार
यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान
नाशिक
2024
अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या अनेक व्यावसायिक क्षेत्रांकडे आजकालच्या मुलांचा ओढा आहे. क्रीडा क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने अजूनही विचार केला जात नाही. ग्रामीण भागात तर नाहीच नाही. नाशिक येथील रहिवासी श्रद्धा नलमवार यांनी डिफेन्स क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी होऊन देखील क्रीडा प्रकारातील रुची जोपासली. ‘शिक्षण हा नेहमीच माझ्या करिअरचा आधार राहिला आहे.’ असे त्यांचे म्हणणे आहे.
श्रद्धा ताई केवळ प्रशिक्षकच नाही तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या जज आणि प्रशिक्षकही आहेत. २०१३ पासून, श्रद्धाने विनर शूटिंग क्लब, क्रीडा प्रबोधिनी आणि SVJCT च्या स्पोर्ट्स अकादमीसह विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
श्रद्धा ताईंचे नेतृत्व कोचिंगच्या पलीकडे आहे. त्या मोनाली गोऱ्हे फाऊंडेशनच्या संचालिका, नाशिक येथील विनर शूटिंग क्लबच्या अध्यक्षा आणि नाशिकच्या जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटनेच्या सरचिटणीस आहेत.
श्रद्धा यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्या भारतीय नेमबाजी पथकाचा भाग होत्या तसेच त्यांनी राष्ट्रीय खेळ आणि चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. निष्णात शुटर अंजली भागवत या त्यांच्याच विद्यार्थिनी आहेत, हे आवर्जून नमूद करायला हवे.
श्रद्धा यांच्या सारख्या प्रशिक्षकांमुळे भारताच्या नेमबाजीचे भविष्य खूप चांगले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
श्रद्धा नलमवार यांच्या प्रशिक्षणामुळे आपल्या भारतासाठी अनेक चांगले खेळाडू निर्माण व्हावेत या सदिच्छा. श्रद्धा नलमवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.