मीनाक्षी पाटील
यशस्विनी साहित्य सन्मान
मुंबई
2024
नव्या युगाच्या नव्या स्त्रीवादी जाणीवा व बदलत्या संवेदनशीलता आपल्या लेखणीतून उजागर करणारे संवेदनशील व्यक्तिमत्व असलेल्या कवयित्री , चित्रकार , ललित लेखिका , समीक्षिका म्हणजे डॉ .मीनाक्षी पाटील!
डॉ. मीनाक्षी पाटील यांची संपूर्ण शैक्षणिक कारकिर्द अत्यंत उज्वल असून बी.ए. तसेच एम.ए.ला ( सौंदर्यशास्त्र ) मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना सहा सुवर्णपदके मिळाली आहेत . सुरुवातीला काही काळ अध्यापन क्षेत्रात काम केल्यावर आजमितीपर्यन्त शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिवपदावर काम करतांना त्यांनी आपल्या प्रभावी कार्यशैलीने प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय असा ठसा उमटवला आहे .
'इज इट इन युअर डीएनए ' , 'ललद्यदस् ललबाय ' हे काव्यसंग्रह, 'उत्तर -आधुनिकता आणि मराठी कविता ' हा समीक्षा ग्रंथ, 'खानदेशी म्हणी व वाक्प्रचार यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास हा शोधग्रंथ ', 'साधन डायरी ' या हिंदी ग्रंथाचा मराठी अनुवाद, भावांजली या वार्षिकांकाचे गेली सहा वर्षे संपादन, भक्तिपर संगीत हा शोधग्रंथ, 'इनसायडर ' या इंग्रजी काव्यसंग्रहात कवितांचा समावेश अशी त्यांची साहित्य संपदा असून अनेक वृत्तपत्रे तसेच वाड्मयीन नियतकालिकांतून त्या सातत्याने लेखन करतात. भारतात आणि भारताबाहेर विविध देशात त्यांची चित्रप्रदर्शने झाली असून काही लघुपट व माहितीपटांचे लेखन,अभिनय व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. काव्य -चित्र -गीत गायन अशा विविध फ्यूजन शोज् च्या संहिता लेखनासोबत रंगमंचीय सादरीकरणाचे कार्यक्रमही त्यांनी केले आहेत.
“इज इट इन युवर डी.एन.ए.” आणि “ललद्यदस् ललबाय” या दोन कवितासंग्रहांमधून मराठी साहित्यिक क्षेत्रात त्यांनी दमदार ठसा उमटवला आहे. “ललद्यदस् ललबाय” या कविता संग्रहातून आंतरिक व सांस्कृतिक प्रवासाचा समृध्द आलेख आपल्यासमोर उलगडल्याशिवाय राहत नाही. या संग्रहातील कवितेची भाषा बदलत्या व सशक्त स्त्रीकेंद्री आत्मभानाला पेलून धरते. तसेच मराठी कविता लेखनाला अभिव्यक्तीचे एक नवे परिणाम उपलब्ध करून देते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
असं म्हणतात की साहित्य वाचलं गेलं की संपूर्ण पिढी वाचली जाते. कथा, कादंबऱ्या यातून ही साहित्य परंपरा जपली जाते. मुंबईच्या मीनाक्षी पाटील यांच्या सकस लेखणीतून अवतरलेल्या लिखाणामुळे या साहित्य परंपरेत भर पडली आहे.डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या विविध कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय अष्टपैलू कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
आपल्या प्रखर सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेलं आंतरिक सत्त्व आपल्या साहित्यात प्रभावीपणे जपणाऱ्या डॉ. मीनाक्षी पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी साहित्य सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.