वैष्णवी ढोरे

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2025

१८ एप्रिल १९९८ रोजी जन्मलेल्या वैष्णवीचा जीवन संघर्ष अग्नीदिव्यातून तावून-सुलाखून निघाला आहे. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले, पण आईने पाहिलेलं स्वप्न मात्र वैष्णवींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जिवंत ठेवलं. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून सुरू झालेला हा अभिनयाचा प्रवास पुढे एका मोठ्या टप्प्यावर येऊन पोहोचला. बालकलाकार म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पटकावत त्यांनी आपल्यातील अभिनय गुणांची चुणूक जगाला दाखवून दिली.

गुरु स्वाती दैठणकर यांच्यामुळे वैष्णवी यांना नृत्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर दिल्लीतील रमा वैद्यनाथन यांच्याकडे त्यांनी भरतनाट्यमचे शास्त्रशुद्ध धडे गिरवले. 'ख्वाडा' चित्रपटातील 'बानू' या भूमिकेने त्यांना घराघरात पोहोचवलं आणि एक कला गुण संपन्न अशी उमदी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. आज वैष्णवींच्या नृत्याचे घुंगरू केवळ मायदेशातच नव्हे, तर अमेरिका, फ्रान्स, स्पेन आणि सिंगापूर अशा सातासमुद्रापार असलेल्या रंगमंचावरही तितक्याच दिमाखात घुमत आहेत.

यशाच्या शिखरावर असूनही वैष्णवी यांचे पाय अजूनही मातीचेच आहेत. 'Aravindam India' आणि आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू केलेल्या 'सुशीला फेस्टिव्हल'च्या माध्यमातून त्या आजही वस्तीतील मुलांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देत आहेत. कलेला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या वैष्णवी ढोरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी