कमलेश महाले
युवा साहित्य पुरस्कार
2025
घरची परिस्थिती बेताची पण शिक्षणाचा दांडगा ध्यास; त्यामुळे पण बालभारतीच्या पुस्तकातील लेखकांच्या साहित्याचं पहिलं बीज मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी पेरलं गेलं. सहावीत असताना 'फास्टर फेणे' वाचण्याची ओढ लागली आणि पावलं वाचनालयाकडे वळली. तिथून सुरू झालेला हा प्रवास पुढे दलित, ग्रामीण आणि आदिवासी साहित्यापर्यंत पोहोचला आणि तिथूनच कमलेश यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली.
ज्येष्ठ लेखक दिनानाथ मनोहर यांच्या एका प्रामाणिक प्रतिक्रियेने कमलेश यांना अंतर्मुख करायला लावलं. ‘साहित्य ही साधी गोष्ट नाही; ती एक साधना आहे’ आणि मग... तिथूनच त्यांच्या कवितेचा प्रवास अधिक प्रगल्भ, अधिक धारदार झाला.
कमलेश केवळ कवी नाहीत, तर ते व्यवस्थेवर प्रहार करणारे एक मूलगामी युवा भाष्यकार आहेत. "लोकांच्या अंगावर चिंध्या असताना, तुम्ही चंद्रावर जाण्याच्या कविता कशा लिहिता?" असा टोकदार प्रश्न ते समाजाला आणि या व्यवस्थेला विचारतात.
त्यांच्या शब्दांत भालचंद्र नेमाडेंचा प्रभाव आहे आणि अरुण कोलटकरांनंतरची पोकळी भरून काढण्याची विलक्षण ताकदही! समाज, धर्म आणि व्यवस्था... एवढंच नाही, तर स्वतःवरही ते तितक्याच निडरपणे भाष्य करतात.
नव्या पिढीचा हा अस्सल, निडर आणि जागतिक जाणिवांचा आवाज कमलेश महाले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.




