राजश्री गुगळे

युवा क्रीडा पुरस्कार
2025

नागोठण्याच्या मातीत जन्मलेल्या राजश्री यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षीच संकटांशी दोन हात करायला सुरुवात केली; पण मैदानात नाही, तर अथांग पाण्यात! त्यांनी झेप घेतली ती थेट यशाला गवसणी घालण्यासाठीच! रिलायन्स इंडस्ट्रीज आणि पुण्याचे गरवारे कॉलेज ही त्यांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची माहेरघरं ठरली.

वय वर्ष चार असताना एखादं लहान मूल खेळण्यात रमलेलं असतं; परंतु या वयातच राजश्री यांनी तेव्हा उरण ते गेटवे ऑफ इंडिया हे १५ किलोमीटरचं अंतर पार करून 'अशक्य' शब्दालाच आव्हान दिलं. हा प्रवास इथेच थांबला नाही. कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी जलतरणात ८० हून अधिक पदकं पटकावली. सातवीत असताना मनाला लागलेली 'वॉटरपोलो'ची ओढ त्यांना थेट आशियाई खेळ आणि वर्ल्ड कपच्या रणधुमाळीपर्यंत घेऊन गेली. वयाच्या १७ व्या वर्षी जेव्हा त्यांनी सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताचा तिरंगा फडकवला, तेव्हा अवघ्या जगाने या मराठी पोरीचं कौतुक केलं.

आयुष्यात संकटं तर येतच असतात. डेंग्यूसारख्या आजाराने त्याचं शरीर थकलेलं होतं, पण मन मात्र विजयासाठी आसुसलेलं होतं. आजारपणावर मात करत मिळवलेलं ते 'सिल्व्हर मेडल' त्यांच्या पोलादी जिद्दीची साक्ष देतं. त्यांच्या या दैदीप्यमान कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सर्वोच्च 'शिवछत्रपती पुरस्कारा'ने सन्मानित केलं.

त्यांचा विवाह झाला, आयुष्य बदललं, पण खेळाप्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. संसाराची जबाबदारी पेलत असतानाच, २०२५ च्या नॅशनल गेम्समध्ये पुन्हा एकदा सिल्व्हर मेडलवर नाव कोरीत त्यांनी महाराष्ट्राची शान टिकवून ठेवली.

या २५ वर्षांच्या दैदीप्यमान यशाची खरी शिल्पकार ठरली ती म्हणजे त्यांची 'आई'. आईच्या कष्टाला लेकीने जिद्दीच्या बळावर अनेक पदके मिळवत मानाचा मुजराच केला आहे. राजश्री सारख्या तेजस्वी आणि जिद्दी खेळाडूला यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण युवा क्रीडा पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी