पद्मजा राजगुरू

युवा इनोव्हेटर पुरस्कार
2024

एका सुशिक्षित, चांगल्या घरातली मुलगी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारी एक मुलगी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्वत:तयार केलेली पाकीटे, पर्स विकत होती. हे दृश्य बघणाऱ्याला अनेक प्रश्न पडायचे. परंतु सोशल मिडीयाचा बोलबाला नसलेल्या काळात आपले product लोकांना आवडते का? याची शाहनिशा करायला स्वत: कंपनीची मालकीण 'सेल्सगर्ल'ची भूमिका बजावत होती. याच लोकल मधल्या एका प्रवाशाने स्वत:चा brand बनविण्याची सूचना केली. त्याचा गांभीर्याने विचार करून पद्मजा राजगुरू यांनी 'केपी इंडस्ट्रीज'च्या अंतर्गत ‘ऑरा’ नावाचा चामड्याच्या वस्तूंचा brand बनविला.

नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी तर 'सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग' या विषयातून तिने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. लहानपणापासून पद्मजा यांना मुंबई बद्दल विशेष आकर्षण होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर एका उच्चशिक्षित, सुसंस्कृत, हुशार तरुणासोबत पद्मजा यांचा विवाह पार पडला आणि त्या मुंबईला स्थायिक झाल्या. पुढे कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून पद्मजा यांनी कुठेच नोकरी केली नाही. तीन वर्षानंतर त्यांनी घराबाहेर पडून नोकरी करायचे ठरवले. स्वतःच्या जिद्दीवर त्यांनी एक एक स्वप्न पूर्ण करत गेल्या. 'अॅक्सेंचर' या मोठ्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली आणि एक स्वप्न साकार झाले. परंतु अल्पावधीतच त्यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून बिसनेस करायचा, हे मनाशी पक्के केले. या निर्णयामध्ये त्यांच्या पतीने त्यांची साथ दिली परंतु बाकी लोकांनी त्यांना वेड्यात काढले.

चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारुपाला आला आहे. मात्र एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. म्हणूनच सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पद्मजा यांनी आयटीमधील नोकरी सोडून आपल्या पिढीजात व्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू केले आहे. पद्मजा यांनी त्यांचा द ऑरा नावाचा ब्रँड मार्केट मध्ये इंट्रोड्युस केला. त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक पण केले जात आहे. फक्त दोन वर्षांच्या बिसनेस कारकिर्दीत पद्मजा यांनी केपी इंडस्ट्रीज ही कंपनी नावारूपास आणली आणि आज त्या लेदर क्षेत्रात लाखोंचा व्यवसाय करत आहेत. आता लोकांनी त्यांना लेदर क्वीन म्हणून पदवी बहाल केली आहे.

आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवून आपला स्वत:चा ‘ऑरा’ निर्माण करणाऱ्या पद्मजा राजगुरू यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी