विनायक होगाडे

युवा साहित्य पुरस्कार
2024

शब्दांवर प्रेम, सत्याची आवड आणि सामाजिक बांधिलकी या तीन शब्दांत विनायक होगाडे यांची कहाणी सांगता येईल. इचलकरंजीमध्ये जन्माला आलेल्या विनायक यांना लहानपणापासून लिखाणाची आवड होती. हा त्यांचा प्रवास पत्रकारितेच्या माध्यमातून आज साहित्य क्षेत्रात येऊन पोहोचला आहे. राष्ट्र सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यामुळेच त्यांच्या शब्दांना धार आणि उद्देशाला आकार आला आहे.

सकाळ, लोकसत्ता, टाइम्स इंटरनेट ते बीबीसी मराठी हा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आहे आणि तो निर्भयपणे चालूच आहे. पत्रकारितेच्या पलीकडे त्यांच्या शब्दांना साहित्यात घर मिळाले आणि बघता बघता तीन पुस्तके झाली. आता चौथे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. ‘फीलिंग अस्वस्थ’, ‘ओह माय गोडसे’ आणि ‘डियर तुकोबा’ ही त्यांची पुस्तके आहेत. ‘विठोबा मिसींग इन पंढरपूर’ ही कादंबरी लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा ! ‘डियर तुकोबा’ या पुस्तकासाठी त्यांना ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं.

आज एका पत्रकाराचा नव्हे तर एका नव्या दमाच्या सत्यशोधकी साहित्यिकाचा सन्मान करत आहोत. विनायक यांची लेखणी अधिकाधिक निर्भय होत राहो, या सदिच्छा आणि युवांना प्रेरणा देत राहील हीच एक आशा आहे.

विनायक होगाडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी