कल्पेश समेळ
युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2024
नाट्यसृष्टी म्हणजे भव्य रंगमंच, प्रखर लाईट्स हेच आपल्या डोक्यात येते परंतु कल्पेश यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला. टायनी टेल्स थिएटर कंपनीच्या सहाय्याने “फिरतं नाटक” ही संकल्पना निर्माण केली. याद्वारे आजपर्यंत शंभर हून अधिक गावांमध्ये त्यांनी नाटकं सादर केली आहेत. कला आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर मिटवून संवाद साधण्याचा प्रयत्न म्हणजे हे “फिरतं नाटक” संकल्पना ! नाट्यगृहांच्या सीमा ओलांडून, छोट्या जागांमध्ये प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारं नाटक कल्पेश आणि सहकाऱ्यांनी उभं केलं आहे. देशातील प्रत्येक गावागावात ही संकल्पना घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप सदिच्छा!
डोंबिवलीतील आगरी कोळी समाजात जन्मलेला कल्पेश नाट्यसृष्टीत पाऊल ठेवणारा त्याच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती ठरला. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचा पदवीधर असून त्यांनी गेल्या दशकात अभिनय, दिग्दर्शन आणि नाट्य शिक्षणात चौफेर मुशाफिरी चालू आहे.
या नाट्यकलेच्या माध्यमातून विविध भाषा, संस्कृती सांभाळत कल्पेश यांनी महाराष्ट्रातल्या गाव खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय रंगमंचापर्यंत त्यांनी यशस्वी प्रवास केला आहे. कलासक्त कल्पेश यांना “ह्युंदाई आर्ट फॉर होप ची Grant मिळाली आहे तसेच नसीरुद्दीन शाह यांच्याकडून गोष्टरंग फेलोशिप सारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. कल्पेश यांनी ‘कडेकोट कडेलोट’, ‘मेरी सहेली’ यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या व्यावसायिक रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘किरकोळ नवरे’ या नाटकाचं सह दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केले आहे.
रंगभूमीला आपल्या दूरदर्शी संकल्पनेतून जिवंत ठेवणाऱ्या कल्पेश समेळ यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.