ऋतुजा जेवे

युवा सामाजिक पुरस्कार
2024

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉप्म्युटर इंजिनिअर असणाऱ्या ऋतुजाने एक आशादायी आयटी करिअर मागे सोडले. शिक्षण ही अनेक संधीची गुरुकिल्ली आहे, हे ओळखून ऋतुजा यांनी लाखो लोकांसाठी हे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला.

‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेपासून तिच्या सामाजिक क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री ग्रामीण फेलोशिपने तिच्या उद्देशांना आकार दिला. दोन वर्षे तिने मराठवाड्यातील गावांमध्ये पाणी, शिक्षण आणि सामाजिक समस्यांवर काम केले.

तिच्यासमोर खरे आव्हान होते ते शिक्षणात नेमके कसे परिवर्तन घडवून आणायचे? याच आव्हानामुळे ‘वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन’ ही संस्था जन्माला आली. २०१८ मध्ये, सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण या दृष्टीकोनातून प्रफुल्ल शशिकांत याच्या साथीने ऋतुजा यांनी ही संस्था स्थापन केली.

कोव्हीड मध्ये शाळा बंद पडल्यानंतर महाराष्ट्रातील सहा पेक्षा अधिक जिल्ह्यात काम करून, सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने २५०० शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन ‘व्ही-स्कूल’ नावाचे application बनवले. ज्याद्वारे पहिली ते दहावीच्या तीस लाख विद्यार्थ्यापर्यंत मोफत डीजीटल अभ्यासक्रम पोहोचवला गेला. गेल्या दोन वर्षात, व्ही-स्कूल द्वारे निपुण भारत मिशन अंतर्गत दर महिन्याला दीड लाख विद्यार्थ्यांचे मोफत मुल्यांकन केले गेले. यातून मिळणाऱ्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित शासकीय योजनेमुळे दोन जिल्ह्यांमध्ये FLN च्या निकालांमध्ये दरवर्षी ३०-३५ टक्के वाढ झाली आहे. या प्रकल्पा द्वारे , VOPA ने एका वर्षात तीन लाख पेक्षा अधिक प्रशासकीय तास वाचवले.

शिक्षण आणि सामाजिक बदलाचा एक आशेचा किरण म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये पाहिले जाईल, यात कसलीच शंका नाही. ऋतुजा यांच्या कार्यातून लाखो लोकांचे जीवन उजळून निघावे, याच सदिच्छा !

ऋतुजा जेवे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी