संदेश भोसले
युवा उद्योजक पुरस्कार
2023
पोहे हा खाद्यपदार्थ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी खाल्ला जातो. स्वस्त आणि पचायला हलकंफुलकं हे पोह्याचं आणखी एक वैशिष्ट्य. लहानपणापासूनच सुदाम्याच्या पोह्यांची कथा ऐकलेली असते. त्यामुळे पोहे या पदार्थाला पावित्र्याचीही किनार आहे. कोणी पोहे देऊ केले तर ते नाकारायचे नाहीत, असंही अनेकांनी आपल्याला सांगितले आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातल्या संदेश भोसले या तरुणाने 'सुदामाचे पोहे' या कल्पक नावाने व्यवसाय सुरू केला. वेगवेगळ्या भागात ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले जाणारे पोहे संदेशने एका छताखाली आणले. ही संकल्पना इतकी यशस्वी झाली की आज 'सुदामाचे पोहे'च्या पुण्यात ३४ शाखा दिमाखात उभ्या आहेत. कोकणी, तर्री, दडपे इंदोरी असे नऊ प्रकारचे खमंग पोहे, तेही अत्यंत वाजवी दरात या दुकानांमध्ये मिळतात; हे ''सुदामाचे पोहे''चं वैशिष्ट्य.
संदेशने अकरावीतच औपचारिक शिक्षणाला राम राम ठोकला. वयाच्या विसाव्या वर्षी चायनीज रेस्टॉरंट सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी कर्ज काढावं लागणार होतं. त्याने आईवडिलांना विश्वासात घेतलं आणि घर तारण ठेवून काही लाखांचं कर्ज काढलं. पण तो धंदा तोट्यात गेला. भोसले कुटुंब कर्जबाजारी झालं. घरजप्तीच्या नोटिसा येऊ लागल्या. संदेश सांगतो, ''कर्ज इतकं होतं की छोटीमोठी नोकरी करून ते फेडणं शक्य नव्हतं. ते कर्ज फेडायचं असेल तर पुन्हा व्यवसाय, पण तो विचारपूर्वक करणं मला भाग होतं.'' एखादा चांगला व्यवसाय करूनच विस्कटलेली आर्थिक घडी बसवायची, यावर संदेश ठाम होता. त्यानंतर त्याने व्यवसाय निवडण्यासाठी तो रोज सकाळी पुणे शहरातल्या विविध भागातल्या खाऊ गल्ल्यांमध्ये भटकू लागला. त्यानंतर त्याला सुदाम्याचे पोहे या व्यवसायाची संकल्पना अवतरली.
खाद्यपदार्थांच्या व्यवसायाचा असा विस्तार करताना पदार्थांची चव आणि दर्जा यात फरक पडणार नाही याची सतत काळजी संदेश घेत असतो. संदेशने या व्यवसायाच्या जोरावर आपल्या कुटुंबावरचं कर्जाचं ओझं हलकं केलंच. शिवाय 'सुदामाचे पोहे' या आगळ्यावेगळ्या व्यवसायाची पुण्यामध्ये ओळख निर्माण केली. आर्थिक बाबतीत या व्यवसायाला यशस्वी म्हणता येईलच. पण संकल्पनेच्या पातळीवरही हा व्यवसाय यशस्वी झाला आहे, असं म्हटलेलं वावगं ठरणार नाही.
संदेश भोसले यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.