डॉ. यशवंत मनोहर
मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक
2023
संवेदनशील अस्वस्थ कवी, ज्ञाननिष्ठ संशोधक, साक्षेपी विचारवंत आणि समीक्षक म्हणून आपण महाराष्ट्राला परिचित आहात. आपल्या वाङ्मयाने महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध आणि संपन्न झालेले आहे.
सत्तरच्या दशकातील 'उत्थानगुंफा' हा आपला पहिलाच काव्यसंग्रह लक्षवेधी ठरला. त्यानंतर आपले 'मूर्तीभंजन' आणि 'जीवनायन' हे मौलिक काव्य संग्रह प्रकाशित झाले. 'शब्दांची पूजा करत नाही मी, माणसांसाठी आरती गातो' आणि 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे' या सारख्या ओळींनी सूर्यकुळातले कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित झालात. तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता आणि धगधगत्या ज्वालेची कविता म्हणून आपल्या कवितेस मराठी काव्यविश्वात एक विशेष स्थान आहे. आपल्या जडणघडणीच्या काळात डॉ. म. ना. वानखेडे, डॉ. भालचंद्र फडके, प्रा. रा. ग. जाधव व प्रा. वा. ल. कुळकर्णी या शिक्षकांच्या समज व वाङ्मय दृष्टीचा विलक्षण प्रभाव आपणांवर पडला. अस्वस्थ शतकाचा संवेदनशील कवी म्हणून जवळपास अकरा कवितासंग्रहातून आपली कविमुद्रा उमटविली ती महत्त्वाची ठरली. जातवास्तव आणि शोषणाची धगधगती रूपे कवितेतून मांडली. लढाऊ आक्रमकपणा व विद्रोहाचे क्रांतिशास्त्र आपल्या कवितेत आहे. संविधान मूल्याचा आणि माणुसकीचा गहिवर आपल्या कवितेतून सतत मांडत राहिलात. भांडवली सत्तेची उन्मादी रूपे व जागतिकीकरणाच्या काळ्या सावल्यांचा निषेध स्वर आपल्या कवितेने मांडला. डॉ. आंबेडकरांविषयीची गौरव-कृतज्ञता-कविता आपण गायिली. सामाजिक बांधिलकी, मानवतावादी मूल्ये, इहवादी परिवर्तन दृष्टी, चिंतनशीलता, संवादशीलता, काव्यात्मता आणि तेजस्वी शब्दकळा ही आपल्या कवितेची वैशिष्ट्ये होत. आपल्या कवितेस 'सेक्युलर कविता' म्हणून विशेष मोल आहे. कवितेबरोबरच आपण कादंबरी, ललितगद्य, समीक्षा व वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. रमाई, सावित्री व यशोधरा या महानायिकांचे भावदर्शन कादंबऱ्यांतून मांडले. आपल्या वैचारिक वाङ्मयाने मराठी विचारविश्वात मोलाची भर घातली आहे. तथागत गोतम बुद्ध, महात्मा फुले, कार्ल मार्क्स व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारदृष्टीला पुढे घेऊन जाणारे 'आजचे' लेखन आपण केले. समाजचिंतन, समाजप्रबोधन व भूमिकानिष्ठ लेखनास आपण कायम महत्त्व दिले आहे. जवळपास वीस विचारग्रंथ व वीस पुस्तिकांमधून आपले विचारधन विखुरलेले आहे. बुद्धविचार व आंबेडकरी दृष्टीची भक्कम बैठक आपल्या लेखनास आहे. शंबूक, कर्ण, एकलव्य या पर्यायी वंचितांच्या वीरनायकांचा आपण घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. वैचारिक लेखनाबरोबर आपण लिहिलेली समीक्षा महत्त्वाची आहे. जवळपास पंचवीस समीक्षाग्रंथात आपली सैद्धांतिक व उपयोजित समीक्षा समाविष्ट आहे. बुद्धिवादी, इहवादी सौंदर्यशास्त्र आणि पर्यायी सिद्धान्तनांची मांडणी ही आपल्या समीक्षालेखनाची वैशिष्ट्ये आहेत. 'हस्तक्षेपाचे स्वातंत्र्य आणि सौंदर्य' असे आपल्या एकंदर समीक्षेचे स्वरूप राहिले आहे. आपल्या लेखणीतून उमटणारे समाजभान कायम ठेऊन त्याच्याशी अखंड प्रामाणिक असणारे साहित्यिक अशी आपली ओळख आहे.
भूमिकानिष्ठ कार्यकर्ता म्हणूनही आपली महाराष्ट्राला ओळख आहे. ती नेहमीच काळ व समाज सुसंगत राहिली आहे. आपण आपली सामाजिक व राजकीय हस्तक्षेपाची भूमिका कायम मांडत आला आहात. माणुसकीच्या प्रतिष्ठापनेसाठी सामाजिक चळवळीत सक्रीय राहिलात. बुद्ध, फुले, आंबेडकर या त्रिवेणी विचारधारेचे नव्या माणसाचे गाणे आपण लिहिले. अखंड ओघवते प्रपाती वक्तृत्व, रचनात्मकतेचा ध्यास, अपूर्व संवादशीलता, डोळस विवेकी भान आणि कार्याचे झपाटलेपण हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत. संविधानदृष्टीतील भारत हा आपल्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व वाङ्मयीन संस्थांवर आपण काम केले. आपल्या सामाजिक व वाङ्मयीन कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी आपणांस सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाच्या वाड्मय पुरस्कारासह दिनकरराव जवळकर पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार तसेच महाराष्ट्र फाऊण्डेशच्या पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे द्रष्टे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ३० ऑगस्ट १९६१ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर 'डॉ. आंबेडकरांच्या विचारपरंपरेचा वारसा' या विषयावर भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी दीक्षाभूमी आणि डॉ. आंबेडकरांचा विचारवारसा देशाला तारेल असे म्हटले होते. तसेच बौद्ध धर्म आणि लोकशाही यात त्यांना संगम पहायला मिळाला. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी यशंवतरावांची दृष्टी आणि आपले विचारविश्व हे एकमेकांना परस्परपूरकच आहे. सर्व प्रकारची समानता, राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सामाजिक न्यायाचे यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न होते. आपण त्याला पूरक लेखन आणि कार्य करत आला आहात. एकाअर्थाने उद्याच्या सुंदर दिवसांसाठी नव्या माणसांचे घोषणापत्रच आपण लिहिले आहे. त्यामुळे आपणांस यशवंतराव चव्हाण पारितोषिकाने सन्मानित करताना आम्हास आनंद होतो आहे.