प्रा. एन्. डी. पाटील
ग्रामीण विकास/आर्थिक-सामाजिक विकास
2019
एन.डी. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी या लहानशा गावांत शेतकरी कुटुंबात झाला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे पाटलाघरी जन्मलेल्या या नारायणाची जन्म तारीख शाळेतील मास्तरांनीच निश्चित करुन टाकली. ती जन्म तारीख आहे १५ जुलै १९२९. त्यांच्या कुटुंबात औपचारिक शिक्षणाचा अभाव होता. परंतु एन.डी.नी परिश्रमपूर्वक अर्थशास्त्रामध्ये एम.ए. आणि विधी शाखेची एलएल.बी. या पदव्या प्राप्त करुन घेतल्या. ढवळी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोज नऊ-दहा मैलांची पायपीट करुन रयत शिक्षण संस्थेने आष्टा येथे सुरु केलेल्या हायस्कूलमध्ये पुढील शिक्षणास सुरुवात केली. मॅट्रिक झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले. राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या वसतीगृहात राहून ते राजाराम कॉलेजमध्ये जाऊ लागले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इत्यादि विषयांचे भरपूर वाचन केले. मार्क्स आणि लेनिन यांचे ग्रंथ वाचले. या सर्व ज्ञानार्जनातून त्यांचे वैचारिक व्यक्तिमत्त्व निर्माण होत गेले.
एन.डी. पाटील हे महाराष्ट्राला परिचित झाले ते मुख्यतः संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यवाह होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दौरा करुन संयुक्त महाराष्ट्राचा प्रचार केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धोरण ठरविणारा कार्यकर्ता म्हणून त्यांना मान्यता मिळाली. ते इस्लामपूर कॉलेजचे काही वर्षे प्राध्यापक व प्राचार्य होते. परंतु त्यांचा पिंड सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुरोगामी चळवळीत हिरिरीने भाग घेण्याचा होता. ऑगस्ट १९४७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. सांगलीत पक्षाची शाखा स्थापन करण्यासाठी १९४८ मध्ये झालेल्या बैठकीत एन. डी. उपस्थित होते. त्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षात काम करु लागले. १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष मोठ्या संख्येने निवडून आला त्यावेळी एन. डी. विधान परिषदेत सदस्य होते. ते एकूण १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. १९८५ ते १९९० या काळात ते महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या कालावधीत पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये ते सहकार मंत्री होते. त्या काळात त्यांनी सहकार कायद्यात मूलगामी सुधारणा केल्या व कापूस एकाधिकार खरेदी योजनेचे पुनरुज्जीवन करुन ती यशस्वीपणे राबविली.
एकीकडे राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच त्यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः आपल्या मृत्युपूर्वी एन. डी. ना रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून सहभागी करुन घेतले. १९९० मध्ये ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. तेव्हांपासून कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या या ध्येयवादी शिक्षण संस्थेचे ते नेतृत्व करीत आहेत. गरीबातील गरीब आणि सामान्यातील सामान्य विद्यार्थी यांच्या हिताचा विचार त्यांच्या कार्यामध्ये केंद्रस्थानी राहिलेला आहे. त्यांनी या संस्थेमार्फत हाती घेतलेले अनेक उपक्रम हे त्यांच्या वरील ब्रीदाशी सुसंगत आहेत. दहावी- बारावीला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नापासांची शाळा, दुर्गम ग्रामीण भागातील आश्रम शाळा, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी चालविलेली साखर शाळा ही याची काही उदाहरणे आहेत. त्याचबरोबर काळाची पाऊले ओळखून संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठीही त्यांनी सतत परिश्रम घेतले. गरीब विद्यार्थ्यांना उत्तम व उच्च शिक्षण उपलब्ध करुन दिले तरच त्यांची व राज्याची खऱ्या अर्थाने उन्नती साधता येईल, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. वंचितांसाठी शिक्षण ही कर्मवीरांची प्रेरणा घेऊन ते रयत शिक्षण संस्थेच्या कामाला भविष्यदर्शी दिशा देत राहिले. त्यातूनच रयत शिक्षण संस्थेमध्ये औद्यागिक प्रशिक्षण संस्था, संगणक प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील नॉलेज अँड टेक्नॉलॉजी इंस्टिट्युट, गुरुकुल प्रकल्प, सावित्रीबाई फुले दत्तक पालक संस्था व विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन अशा संस्था त्यांनी स्थापन केल्या.
एन.डीं.चे आयुष्य पुरोगामी चळवळी, सत्याग्रह आणि आंदोलने यांनी व्यापलेले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी १९४५ मध्ये ग्रामीण भागात दारुच्या दुकानासमोर केलेले पिकेटिंग हे त्यांचे पहिले आंदोलन. गोवामुक्ती संग्राम, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची अंमलबजावणी, सीमा प्रश्न, धरणग्रस्तांचे आंदोलन, जागतिकीकरणाविरोधातील आंदोलने अशा अनेक आंदोलनात त्यांनी सामान्य जनतेचे नेतृत्व केले. त्यांच्या आग्रही प्रतिपादनामुळे महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्याचे ठरविले व त्याची सर्व जबाबदारी एन. डी. पाटील यांच्यावर सोपविली. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. समाजाच्या परिघावरील किंवा परिघाबाहेरील सामान्य माणसांच्या कल्याणासाठी ज्या ज्या परिवर्तनवादी चळवळी महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या चळवळींमध्ये एन. डीं. चा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला आहे अशा समाजासाठी एन. डीं. चे नेतृत्व हा मोठाच आधारस्तंभ राहिला आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षात त्यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. आमदार कोट्यातून मिळणारी सदनिका आणि मुख्यमंत्री कोट्यातून मुलाला मिळालेला वैद्यकीय शाखेतील प्रवेश त्यांनी सहजपणे नाकारला. त्यांनी काही काळ राष्ट्रीय बियाणे मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. तेदेखील या पदाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा भत्ता घेणार नाही अशी अट घालून. ते संस्थेची गाडी कधी वापरीत नाहीत. त्यांच्या साध्या राहणीच्या या निष्ठावंत बांधिलकीमुळे त्यांनी आदर्श लोकप्रतिनिधी व लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. त्यांच्या सत्प्रवृत्त व झुंजार नेतृत्वाला दाद देऊन स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या नामवंत संस्थांनी सन्माननीय डी. लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. अशा या ध्येयवादी व कर्मयोगी व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' प्रदान करताना 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई'ला विशेष आनंद होत आहे.