लोकहितवादी मंडळ

मराठी साहित्य-संस्कृती / कला
2020

२०२० चा राज्यस्तरीय पुरस्कार १९५० मध्ये कवी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या लोकहितवादी मंडळ, नाशिक या संस्थेला देण्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ठरविले आहे. एरवी नाशिकची प्रसिद्धी एक धार्मिक तीर्थक्षेत्र व दर १२ वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे पवित्र ठिकाण अशी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिक हे क्रांतिकारक चळवळीचे केंद्र होते. १९५० मध्ये नाशिकला कायमच्या वास्तव्यासाठी आलेल्या कुसुमाग्रजांनी नाशिकमध्ये मराठी साहित्य आणि कला विचार यांच्या संवर्धनासाठी एक सांस्कृतिक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. दिनांक २ सप्टेंबर १९५० रोजी अग्रणी समाजसुधारक व शतपत्रांचे कर्ते श्री. गोपाळ हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांच्या नावाने लोकहितवादी मंडळाचे उद्घाटन म.म. दत्तो वामन पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हांपासून प्रामुख्याने नाट्यसंगीत, चित्रकला, शिल्पकला व अन्य कला तसेच साहित्यविषयक घडामोडी व सामाजिक विचारसरणीचा पाठपुरावा करणारे कार्य मंडळ पार पाडत आहे.

१९५० च्या डिसेंबरमध्ये श्री. राम गणेश गडकरी यांचे 'भावबंधन' हे नाटक सादर करण्यात आले. कुसुमाग्रजांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. गेली सात दशके नाट्यक्षेत्रामध्ये मंडळाने लक्षणीय कार्य केलेले आहे. राज्य नाट्य स्पर्धेत मंडळाला जवळ जवळ दरवर्षी पारितोषिक मिळाले आहे. हिंदी आणि संस्कृतमध्येही मंडळाने नाटके सादर केली असून बालनाट्य आणि कामगार स्पर्धांमध्येही भाग घेतलेला आहे. मंडळाच्या या कार्यातून अनेक कला दिग्दर्शकांना, नवोदित लेखकांना, संगीत दिग्दर्शकांना तसेच प्रकाश योजना, रंगभूषा आणि नेपथ्य या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपली कला सादर करण्यास वाव मिळालेला आहे. २०१५ पासून मंडळाने नाटकाच्या अभिवाचन स्पर्धा घेतल्या आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे झाशी येथे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिरात जेथे झाशीच्या राणीचा साखरपुडा झाला होता अशा ऐतिहासिक ठिकाणी २०१२ मध्ये 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे अभिवाचन झाले.

विष्णू दिगंबर पलूसकर हे ख्यातनाम संगीत गुरू नाशिकला स्थायिक झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाट्यसंगीत स्पर्धा मंडळातर्फे आयोजित केल्या जातात. संगीताला उत्तेजन देण्यासाठी मंडळाने अखिल महाराष्ट्र संगीत स्पर्धांचे आयोजन १९६७ पासून केले आहे. अनेक नामवंत गायकांच्या मैफिली आयोजित केलेल्या आहेत. तसेच नोव्हेंबर १९९९ मध्ये तीन दिवस अखिल भारतीय स्तरावर संगीत शिक्षक अधिवेशन आणि संमेलनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत क्षेत्राशी संबंधित इतर महत्त्वाचे कार्यक्रम, म्हणजे हार्मोनियम वादन, गीत स्वरलेखन कार्य शाळा, बासरी संवाद व ताल समर्पण संवाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

भारत सरकारने राष्ट्रीय सांस्कृतिक धोरण मसुदा तयार केला होता. त्यावर नाशिकला तीन दिवसांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळचे मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. य. दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला होता. त्याचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. शिवराम कारंथ यांनी केले होते. या परिसंवादामध्ये करण्यात आलेल्या मौलिक सूचना राज्य व केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्या.

साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक विषयांशी संबंधित प्रश्नांवर विचार मंथन व्हावे यासाठी महात्मा फुले यांच्या नावाने जिल्ह्यात ग्रामीण भागात व्याख्यानमाला सुरु करण्यात आली. कालांतराने अशी व्याख्याने मंडळाच्या स्थापना दिनादिवशी आयेजित करण्यात येतात. कविता या साहित्य प्रकाराला साहजिकच मंडळाने विशेष प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी काव्यानुभव समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये नामवंत कवी तसेच नवोदित कवी व बालकवी यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम केला जातो.

१९९६ मध्ये मंडळाने कला विभाग सुरु केला. त्याचा शुभारंभ ख्यातनाम चित्रकार व माजी कला संचालक, श्री. बाबुराव सडवेलकर यांच्या हस्ते झाला. कला विभागीय उपक्रमांमध्ये पावसाळी सहल, गुरुशिष्य संवाद आणि कलाविषयक कार्यशाळा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. मंडळाने वार्षिक चित्रकला शिबीर दोन वेळा आयोजित केले होते.

१९९९ मध्ये पहिला राज्यस्तरीय कला मेळावा नाशिकला घेण्यात आला. लोकहितवादी मंडळाचे कार्य स्वतःच्या वास्तूमधून चालावे यासाठी नाशिक महानगरपालिकेने मंडळाला एक भूखंड काही अटींवर दिला. या वास्तूच्या उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी मुख्यमंत्री निधीतून भरीव अर्थ सहाय्य केले होते. महात्मा फुले यांचे कार्य स्मरणात असावे म्हणून व वास्तूच्या रचनेत छपरावर कलशाचे शिल्प असल्याने कुसुमाग्रजांनी या वास्तूस 'ज्योतीकलश' हे नांव दिले. ज्योतीकलश उभा आहे त्या परिसराला विशाखा प्रांगण हे नांव देण्यात आले. 'विशाखा' हा कुसुमाग्रजांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे हे लक्षात घेऊन नामकरण करण्यात आले आहे.

साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार आहे. तो मराठीतील मोजक्याच साहित्यिकांना मिळाला आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हां मंडळाने भव्य अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी कुसुमाग्रजांच्या मनातील साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक जाणिवांना कायमस्वरुप देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या स्थापनेमध्ये मंडळाचे भरीव योगदान आहे.

कुसुमाग्रज हे मराठीतील नामांकित कवी व नाटककार आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कामगिरीप्रमाणेच समाजाविषयी सजग व क्रियाशील विचारवंत म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विशेषतः मराठी भाषेचे संवर्धन व विकास यांचा ध्यास असलेले साहित्यिक म्हणून त्यांच्या जन्मदिवशी (२७ फेब्रुवारी) राज्य शासनातर्फे मराठी भाषा दिन साजरा केला जातो.

नामवंत कवी व लेखकांचे स्वतःच्या एखाद्या कृतीशी अभिन्न नाते असते. उदा. केशवसुतांची 'तुतारी' ही कविता, राम गणेश गडकरी यांची 'क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा' ही कविता, भा. रा. तांबे यांची 'मधुघट' व वि.स. खांडेकरांची 'ययाति' यांचा उल्लेख करता येईल. याप्रमाणे कुसुमाग्रजांच्या अनेक कविता जनमानसात खोल रुजलेल्या आहेत - उदाहरणार्थ 'गर्जा जयजयकार', 'वेडात मराठे वीर दौडले सात', 'काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात'. ज्यावेळी कवीचे काव्य आणि सामान्य वाचकाच्या भावभावना यांच्या तारा एकाच गतीने झंकारतात तेव्हांच ही किमया घडते. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' मधील 'घर देता का घर' हे स्वगत असेच मराठी माणसाच्या मनात घर करुन आहे.

कुसुमाग्रजांची एक साहित्यिक म्हणून अष्टपैलू कामगिरी लक्षात घेता व गेली सात दशके त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे बहुमोल कार्य लक्षात घेता या संस्थेला या वर्षीचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई'ला विशेष आनंद होत आहे.