मधु मंगेश कर्णिक

मराठी साहित्य संस्कृती पारितोषिक
2022

मुंबईतील झोपडपट्टीचं विदारक दर्शन घडविणारी 'माहीमची खाडी' आणि अव्यक्त प्रीतीच्या धाग्यात गुरफटलेली दोन जीवांची काव्यात्म, तरलपणे रेखाटलेली कहाणी 'देवकी'. या दोन्ही कादंबऱ्यांचे जनक एकच आहेत यावर सहजासहजी विश्वास ठेवणं तसं कठीणच, पण हे घडलंय मधु मंगेश कर्णिक या अवलियाच्या लेखणीतून. मधु मंगेश ह्या नादमधुर नावाने ख्यातकीर्त असलेल्या एका अष्टपैलू साहित्यिकाचा तब्बल नव्वद वर्षे आनंदाने वाहणारा हा कोकणी झरा. कोकणचं अद्भूत निसर्गवैभव लेखणीतून झरणारा प्रवाह आजही आटला नाही कि त्याची गोडीही कमी झाली नाही. मधुभाईंनी लिहिण्याबरोबरच माणसंही अधिक तन्मयतेने वाचली. सर्वांना आपलसं करणारा हा एक लोकसंग्राहक माणूस. त्यांनी माणसातल्या माणूसपणाचा शोध घेतलाय म्हणूनच त्यांच्या कादंबरीतील पात्रे साधीच माणसं आहेत. आता काही पात्रं खलप्रवृत्तीची घ्यावीच लागतात. पण ती पात्रं रंगवताना मधुभाईंची लेखणी काही काळासाठी का होईना थबकली असेल.

शेक्सपियरनं म्हटलय नावात काय आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर मधुभाई ह्या नावातच दडलेलं आहे. आपल्या नावाला काहीही उपाधी जोडली गेली तर आफतही येऊ शकते इतकी 'भाईगिरी' फोफावली आहे. पण पुलं भाई झाले, मधुभाई लिमये, मधुभाई दंडवते ह्या नामावलीत आपणही आदराची जागा मिळवलीय.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं. त्यांच्या कार्यकाळात आपण प्रशासनात सक्रिय होतात. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांचे दालन म्हणजे एक वेगळी पंढरी होती. त्यात आपण मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्कप्रमुख. एक साहित्यिक म्हणून अनुभवलेले सामान्यांचे प्रश्न तुमच्या साहित्यात अवतरले. मराठी भाषेच्या व्यवहार वापरासाठी आपण कायम आग्रही राहिलात. मधुभाई आपणांला कोकणापासून आणि सागरापासून विलग करणे अवघड आहे. म्हणूनच आपल्या लिहिण्या बोलण्यात ती गाज अव्याहत झंकारत राहते.

साहित्याच्या पालखीचा एक सेवेकरी म्हणून आपला जीवन प्रवास सुरूच आहे. टाळ मृदुंग हाती घेतलेले आपण साहित्यातून सुंदराच्या शोधाकडे जात आहात. आपणास नव्वदीच्या पुढेही लय मिळतच राहील.

आपल्या ह्या व्यासंगी, कार्यकुशल अशा अनोख्या व्यक्तिमत्वाला आमचा कृतार्थ नमस्कार !