कुसुम राहसे
शेती-पाणी पुरस्कार
2025
नंदुरबार जिल्ह्यातील एक उद्योगशील शेतकरी महिला म्हणजे कुसुम सुनील राहसे ! बारावी पास होण्याआधीच त्यांचे लग्न घरच्यांनी लावून दिले. परंतु, काळाने घाला केला आणि २०१५ मध्ये कुसुम यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. तब्बल पंधरा वर्षांनंतर बारावीची परीक्षा देऊन पास झाल्या. घरची अडीच एकर शेती होती. परंतु, कोरडवाहू शेतीतून उदरनिर्वाह करणे कठीण होते. अशातच त्यांनी टाटा सिनी संस्थेच्या लखपती किसान कार्यक्रमात सहभाग नोंदवला आणि शेतीविषयक ज्ञानात भर पडली.
‘ज्योती गाव उपजीविका समिती’ गावात स्थापन केली आणि त्यांची सचिव म्हणून निवड झाली. गावच्या शेती विकासासाठी त्या झपाटून कामाला लागल्या. गावात पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. २०१८ मध्ये तीन कुटुंबांच्या साथीने विहीर दुरुस्ती केली, त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. परिणामी ज्या ठिकाणी एकही पीक येत नव्हते त्या ठिकाणी एक एकर बागायत बहरली. पुढे लोकसहभागातून त्यांनी २०१९ मध्ये अर्धा एकरवर जैन कंपनीचे ठिबक बसवले आणि मिरची पिकातून ऐंशी हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
गावात लाईटची समस्या भरपूर जाणवत होती. ती समस्या सोडवण्यासाठी, कुसुम ताईंनी पुढाकार घेऊन सोलर पाईपलाइन बसवली. पुढे, गावातच ‘याहामोगी शेतकरी उत्पादक कंपनी’ स्थापन केली आणि त्या कंपनीच्या सचिव पदाची जबाबदारी पुन्हा कुसुम ताईंवर आली. त्यांच्या पुढाकारामुळे त्यांनी सभासद वाढवले, गावागावात मीटिंग घेतल्या. स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी संस्थेचे आणि शेतीचे काम वाढवले. आपल्या जिद्दीच्या जोरावर कुसुम ताईंनी स्वत:चा आणि गावचा विकास साधला आणि समाजकार्यात मोठी भूमिका बजावली, असे म्हणायाल हरकत नाही.
कुसुम सुनील राहसे यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.