साधना वर्तक
शेती-पाणी पुरस्कार
2025
लग्नाच्या दुसऱ्याच वर्षापासून साधना यांच्या सासूबाईंनी शेतीची जबाबदारी संपूर्णपणे त्यांच्यावर सोपवली. शेतीतील म्हणावे एवढे ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या सासूबाईंनी मात्र त्यांना सर्वकाही शिकवले. हि शेती करत असताना त्यांनी केळी, अळू , कारली, पडवळ, शिराळा, शहाळे, सुपारी हि पिके घेतली. जवळपास दहा वर्षे त्यांनी जोमाने शेती केली. परंतु सासुबाईंचे आजारपण आणि मुलांचा अभ्यास त्यामुळे शेतीकडे लक्ष कमी केले.
साधना ताईंचा सुखाचा संसार चालू होता. परंतु हे काळाला मान्यच नव्हते. २०२० साली त्यांच्या पतीचे अचानक निधन झाले. त्या धक्क्याने पाठोपाठ आठ दिवसातच त्यांच्या सासूबाईंचे निधन झाले. दोन्ही भक्कम आधार गेल्यामुळे त्यांना आता पुढे काय? हा प्रश्न सतावू लागला. जिद्दी असणाऱ्या साधना ताईंनी खचून न जाता पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. घरात असणाऱ्या पुंजीतून त्यांनी आपले भांडवल उभा केले आणि पानवेल पुन्हा बहरू लागली. कालांतराने त्यांनी ठिबक सिंचन बसवले. त्यामुळे उत्पादनात भर पडली.
अडीच एकरात त्यांनी आपली शेती फुलवली. नारळ, सुपारी, कारली, गलका, पानवेल हि पिके त्यांच्या शेतात पिकतात. या शेतीच्या जोरावर त्यांनी मुलांचे शिक्षण केले. स्वत:चा उदरनिर्वाह केला. त्याचबरोबर अनेकांच्या हाताला काम देखील दिले. साधना ताईंची शेती उत्तरोत्तर अशीच बहरत राहो, याच सदिच्छा !
साधना वर्तक यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.