सुचिता खल्लाळ
साहित्य पुरस्कार
2025
ग्रामीण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुचिता खल्लाळ यांनी गावखेड्यातील लोकजीवन अनुभवत आपल्या काव्यप्रतिभेचा अवकाश समृद्ध केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी शिक्षक, त्यानंतर सरळ सेवा भरतीने 'शिक्षण विस्तार अधिकारी' म्हणून नांदेड जिल्हा परिषदेत त्या काम करत आहेत. नुकतेच एमपीएससी द्वारे उपशिक्षणाधिकारी, वर्ग-२ साठी त्यांची निवड झाली असून लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
महाराष्ट्रातील वाङ्मयीन नियतकालिकांतून, नामवंत दैनिके, दिवाळी अंकांमधून त्यांच्या कविता, समीक्षा, ललितलेखन प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता सदानिरा आणि वागर्थ या हिंदी नियतकालिकांत सुनीता डागा यांनी अनुवादित केल्या आहेत. तर बेबाक ऊर्दू मासिकात ऊर्दू अनुवादित कविता प्रकाशित झाल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अभ्यासक्रमात आणि देवगिरी महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात कवितांचा समावेश झाला आहे. सुचिता यांनी लिहिलेल्या ‘स्त्री कवितेचं भान काल आणि आज' या समीक्षाग्रंथाचा मराठवाडा विद्यापीठात संदर्भसाहित्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
सुचिता खल्लाळ यांचे 'पायपोळ', 'तहहयात' आणि 'प्रलयानंतरची तळटीप' हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कविता लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. बदलते स्त्री वास्तव चित्रित करणाऱ्या त्यांच्या कवितांमधील अल्पाक्षरी लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 'डिळी' ही त्यांची पहिली कादंबरी बहुकेंद्री असून, ग्रामीण व निमशहरी भागातील वास्तव प्रगल्भतेने रेखाटते. सध्याच्या काळात लोकांच्या जगण्याचे आयाम कसे बदलत आहेत हे मांडणारी त्यांची कादंबरी आहे. त्यांची साहित्य सेवा अशीच वृद्धिंगत होत राहो, याच सदिच्छा !
सुचिता खल्लाळ यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.