वैभव देशमुख
साहित्य पुरस्कार
2025
कवी, गीतकार आणि गझलकार म्हणून ओळखले जाणारे वैभव देशमुख हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ या गावचे. तिथेच शेती-मातीच्या सहवासात वाढलेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबाद गाठल्यानंतर दहा वर्षे त्यांनी साईन बोर्ड आर्टिस्ट म्हणून व्यवसाय केला. अशा कष्टप्रद कामातून वेळ काढून साहित्य साधनेला प्राधान्य दिले. आणि 'तृष्णाकाठ' व 'हे सारे गुलमोहर माझे' हे कवितासंग्रह साकारले. यापैकी तृष्णाकाठ या संग्रहाला कुसुमाग्रजांच्या पुस्तकांच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा काव्य पुरस्कार’ तर गझललेखनासाठी “गझल उन्मेष पुरस्कार” पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.
६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'नाळ२' चित्रपटासाठी लिहिलेल्या 'भिंगोरी' गाण्यासाठी राज्य शासनाचा 'गदिमा उत्कृष्ट गीत पुरस्कार' त्यांना मिळाला. तर “कुण्या राजाची तू गं राणी” या शीर्षकगीतलेखनासाठी ‘मटा सन्मान’ प्राप्त झाला. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
रिंगण, नाळ, नाळ२, घर बंदूक बिरयानी, बापल्योक, झोंबिवली, जुनं फर्निचर, तेंडल्या, इलू इलू १९९८, सोयरिक, जारण यासह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आणि सातत्याने विविध चित्रपटांसाठी ते लेखन करीत आहेत. तसेच, बाजी, बापमाणूस, छोटी मालकीण, जुळता जुळता जुळतंय की, आई तुळजाभवानी, कुण्या राजाची तू गं राणी यासारख्या मालिकांसाठी लिहिलेली त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. कवी व गीतकार अशा नात्याने वैभव देशमुख यांची नाळ कविवर्य महानोरांशी जुळणारी आहे. वैभव देशमुख यांची साहित्य सेवा अशीच वृद्धिंगत होत राहो याच सदिच्छा.
वैभव देशमुख यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.