अविनाश पोईनकर

साहित्य पुरस्कार
2025

अविनाश पोईनकर हे आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी या छोट्याशा गावातून येतात. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, अभावग्रस्ततेत संघर्ष करत त्यांनी प्रथितयश युवा कवी, लेखक, मुक्तपत्रकार आणि आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून अल्पावधीत ओळख निर्माण केली.

विद्यालयीन जीवनातच लेखनाला सुरुवात करून, अध्यापक पदविका आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१७ साली 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला. यासाठी विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कारासह पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

'विमल गाडेकर: व्यक्ती आणि वाड्मय' या ग्रंथाचे संपादन, 'सुरजागड: विकास की विस्थापन?' हा नक्षलप्रभावित गडचिरोलीतील खाणग्रस्त आदिवासींचा संशोधन ग्रंथ, आणि लोकवाड्मय गृह प्रकाशित 'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह – यांतून गडचिरोली-अभूजमाड-दंडकारण्यातील ज्वलंत मानवी संवेदना उजागर झाल्या आहेत. विविध मासिके आणि वर्तमानपत्रांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहेत.

'जागृत' संस्थेचे संस्थापक म्हणून चंद्रपूर-गडचिरोलीतील कोलाम आणि माडिया समुदायांसोबत जल-जंगल-जमीन प्रश्नांवर ते सध्या कार्यरत आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून घाटकुळ गावाला आदर्श स्मार्ट ग्राम बनवले. मागील दशकभर आदिवासी आणि भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांचा मागोवा घेत वंचितांचा आवाज प्रभावी करणारा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

अविनाश पोईनकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाऊंडेशनचा ‘कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.