गणेश घुले
साहित्य पुरस्कार
2024
महाराष्ट्राच्या मध्यभागी, पडुळी या शांत गावातील शब्दांवर प्रेम करणारा एक संवेदनशील कवी अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे गणेश प्रल्हाद घुले !
गणेश घुले यांचा, घनसावंगी, जिल्हा जालना इथून ज्ञान आणि सर्जनशीलतेचा प्रवास सुरू झाला. रसायनशास्त्रात एमएससी आणि मराठी विषयात एमए करून, त्यांनी भाषेच्या सौंदर्यासह विज्ञानाचा समतोल देखील राखला आहे. ते सध्या “बालकादंबरी" या विषयावर पीएचडी करत आहेत. थोडक्यात शिकणे आणि शिकवणे याचा शोध त्यांनी कायम सुरु ठेवला आहे.
गणेश यांच्या लेखणीतून जगाला ‘गावकडची कविता’ आणि ‘सुंदर माझी शाळा’ सारखे काव्यसंग्रह जन्माला आले. त्यांच्या साहित्याला ‘महाराष्ट्र प्रतिभा’ आणि ‘अभ्युदय’ यांसारख्या दिवाळी अंकांनी पसंती दिली आहे.
त्यांच्या 'जिभेला चवीचे कळते सारे' ही कविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पोहोचली. या कवितेने अक्षरशः बालमनावर गारुड घातले आहे. ऑल इंडिया रेडिओपासून ते साहित्य संमेलनापर्यंत, त्यांचा आवाज घुमतो आहे. ‘सुंदर माझी शाळा’ या अनोख्या संगीत प्रयोगाद्वारे गणेश यांची कविता महाराष्ट्रातील ८० हून अधिक शाळा आणि साहित्य संस्थांपर्यंत पोहोचली आहे, हे विशेष !
एक कवी, एक कथाकार, एक बालकादंबरीकार ‘गणेश प्रल्हाद घुले’ यांना कविता या साहित्य प्रकारासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.