प्रदीप कोकरे

साहित्य पुरस्कार
2024

मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या एका साहित्यिकाने खूपच कमी वयात साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांचे नाव प्रदीप कोकरे !

मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर, प्रदीप कोकरे यांची शब्दांबद्दलची आवड आणखीनच वाढत गेली. ‘मुंबई शहरावर लिहिलेल्या मराठी कवितांचा अभ्यास’ या विषयावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ते पीएचडी करत आहेत.त्यांच्या या संशोधनामुळे मुंबई आणि सांस्कृतिक जडणघडण यावर प्रकाश टाकला जाईल, ही खात्री आहे.

युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कवितारती, लोकसत्ता, काव्याग्रह, वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तसेच लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेचे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी प्रदीप यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठित वृत्तपत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीस २०२२ - २३ सालची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात आली. ‘माझा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत राहण्यासाठी ही फेलोशीप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे’ असं मत प्रदीप वेळोवेळी करत आले आहेत.

जीवन आणि संस्कृती यांची सांगड घालत साहित्यविश्व जगणारे नव्या दमाचे अभ्यासक, लेखक, कवी प्रदीप कोकरे यांना ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारासाठी पहिला यशवंतराव चव्हाण सेंटरचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी