शीला खुणे
शेती-पाणी पुरस्कार
2024
गोंदिया, जिथे एकेकाळी भातशेतीचे वर्चस्व होते. त्याच भागात एका परिवर्तनाची कहाणी सुरु झाली.
अविरत कष्ट करूनही पारंपारिक भातशेतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत असल्याचे शीला ताईंना जाणवले. हीच ती बदलाची वेळ हे त्यांना लवकर कळले आणि स्वत:सह सभोवतालच्या शेतकरी समुदायाला देखील त्याचा फायदा होईल, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू झाले.
अवघ्या 2.30 हेक्टर जमिनीच्या जीवावर त्यांनी धाडस करायचे ठरवले. तांदूळ या पिकाची शेती न करता नाविन्यपूर्ण शेती तंत्रासह टरबूज, पेरू, सफरचंद आणि बेरी या फळांची लागवड केली. बाजारपेठेत जास्त मागणी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा एकरी जास्त उत्पादन झाले. ठिबक सिंचन आणि बोअरवेल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी योग्य वापर करून घेत आपले उत्पादन वाढवले. पाण्याचा प्रत्येक थेंब आणि मातीचा प्रत्येक इंचाचा त्यांनी हुशारीने वापर केला. जिद्द आणि चिकाटीच्या साथीला धोरणात्मक दृष्टीकोन असला की काहीच अवघड नसते, हे त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले.
आपल्या गावातील बाकी शेतकऱ्यांना देखील शीला ताईंनी मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. नवीन शेतीपद्धती अमलात आणण्यासाठी बाकी शेतकऱ्यांना त्या वेळोवेळी प्रेरित करत राहिल्या. थोडक्या शेतीवर त्यांनी आपले संपूर्ण जीवनमान बदलून टाकले.
एक शेतकरी, एक मार्गदर्शक शीला खुणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा शेती-पाणी या प्रकारासाठी यावर्षीचा “ना.धो. महानोर पुरस्कार” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.