ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद व परिसर

राज्यस्तरीय पुरस्कार
2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माहुली किल्ला परिसरातील २०-२५ खेड्यातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन १ ऑक्टोबर २०११ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. त्याचं नाव "ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद व परिसर – ठाणे" ! आजच्या घडीला जवळपास ८८७ आजीव सभासद आहेत. आणि अधोरेखित करावी अशी गोष्ट म्हणजे ५९० महिला सदस्य आहेत. वेळोवेळी मासिक सभा घेऊन ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

आनंद मेळावा, महिला मेळावा, आरोग्य मेळावा सातत्याने राबविण्याचा त्यांचा संकल्प असतो. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते. गेल्या पाच वर्षात एकूण २० सहली निघाल्या असून त्यात ज्येष्ठांनी भरपूर आनंद लुटला आहे.

जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून शहरातून जनजागृतीपर प्रभातफेरी काढली जाते तसेच सामाजिक बांधिलकी शपथ घेतली जाते. तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. ज्येष्ठांच्या स्मरणशक्ती वाढीसाठी विविध खेळांचे आयोजन देखील केले जाते.

"जीवन सुंदर आहे - जगा आणि जगवा" या ध्येयवाक्यावर त्यांचा हा प्रवास असाच अखंड चालू राहो, या सदिच्छा.

आपणास यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.