सुशीला ओडेयर

राज्यस्तरीय पुरस्कार
2025

प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याची आवड असल्याने २००५ मध्ये कोल्हापूरमधील शाहू ज्येष्ठ नागरिक संघाशी सुशीला ओडेयर जोडल्या गेल्या.

या संघात महिलांचा सहभाग अत्यल्प असल्याने २०१० मध्ये सावित्रीबाई फुले महिला संघ स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. पहिले तीन वर्षे त्यांनी सचिव म्हणून काम केले त्यानंतर, नऊ वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

या संघामार्फत सदस्यांना घरी वाढदिवसाचे शुभेच्छा पत्र पाठविण्यास त्यांनी सुरू केले, परिणामी घरीच वाढदिवस अपेक्षितपणे साजरे होऊ लागले. ज्येष्ठांच्या आनंदात भर पडू लागली. संघातील महिला सदस्यांमध्ये स्टेजवर येऊन बोलण्याचे धाडस नव्हते. आजच्या घडीला सदस्य दोन-तीन मिनिटे सहजपणे धाडसाने बोलतात. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कला गुणांना वाव देण्यासाठी २०१८ मध्ये कोल्हापूरातील ज्येष्ठ महिलांसाठी आनंद मेळावा आयोजित केला गेला त्यासाठी अडीचशे महिलांचा सहभाग होता. संघात महिला संख्येत वाढ झाल्याने विविध उपक्रम हाती घेतले गेले. ढासळत्या कुटुंब व्यवस्थेवर "चला कुटुंब वाचवूया" हा शोध प्रकल्प हाती घेतला. संघातील निरक्षर महिलांना सही करण्यास त्यांनी शिकवले.

ग्रामीण भागात जाऊन त्यांनी व्याख्यानांद्वारे महिला जागृती केली. २०१० पासून फेस्कॉमशी त्या जोडल्या आहेत. ॲक्युप्रेशर, योग आणि आनंदाने जगणे यावर व्याख्याने व प्रबोधनपर कार्यक्रम त्यांनी केले.

आजपर्यंत राज्यस्तरीय व राष्ट्रीय इतिहास परिषदांमध्ये सुशीला यांनी मराठ्यांवर इंग्रजी शोधनिबंध प्रकाशित केला आहे. सत्यशोधक विठ्ठल बिराजी डोणे समग्र वाड्मय, श्री मौनी विध्यापीठ, स्वातंत्र्य लढ्यातील विरांगना अशी त्यांची एकुण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणी आणि वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध विषयावर जनजागृती केली आहे. त्यांच्या एकुणात कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

सुशीला ओडेयर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी