रमेश दुसे
राज्यस्तरीय पुरस्कार
2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये रमेश दुसे यांनी ३३ वर्षे यशस्वी सेवा केली आणि २००१ साली उपअभियंता पदावरून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सेवेत झोकून दिले. डॉ. हेडगेवार रुग्णालयात ४ वर्षे सेवाव्रती म्हणून त्यांनी कार्य केले. बौद्धिक असक्षम, आत्मकेंद्रित, बहुविकलांग पाल्यांच्या पालकांसाठी नवजीवन पालक संघाची स्थापना केली. २००७ साली, ४०० प्रतिनिधींचा सहभाग असणारी अखिल भारतीय पालक परिषद भरवली. या परिषदेचा भरपूर फायदा उपस्थित पालकांना झाला.
२०१२ साली बौद्धिक असक्षम मुलांसाठी डे केअर सेंटर आणि २०१३-२०१५ पर्यंत निवासी वसतीगृह त्यांनी चालवले. पालकांसाठी तीन बचत गट चालू केले. विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली. या व्याख्यानाचा दिव्यांगांच्या पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी खूप उपयोग झाला. २००७ पासून त्यांनी "पाल्य स्नेह मुखपत्र"चे संपादकत्व स्वीकारले आहे. ते आजतागायत चालू आहे. आजच्या घडीला पालकांमध्ये त्या मुखपत्राची लोकप्रियता खूप वाढली आहे. ज्येष्ठांसाठी प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेत २०१० साली गटप्रमुख म्हणून त्यांनी प्रवेश केला.२०१४ ते २०१६ सचिव, २०१६ ते २०१८ अध्यक्ष म्हणून त्यांनी पदे भूषवली. रमेश दुसे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघास राम नाईक यांच्या हस्ते ILC-1 पुणे पुरस्कार मिळाला आहे. यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
ह्या समाजसेवेबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही प्रगतीचे शिखर गाठले आहे. आजपर्यंत अनेक वृत्तपत्रातून, मासिकातून बौद्धिक असक्षम मुलांच्या पालकांमध्ये जागृतीसाठी व ज्येष्ठांसाठी त्यांनी भरपूर लिखाण केले आहे. आजपर्यंत दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ या वृत्तपत्रांमधून १५० लेख, ७० कविता प्रकाशित झाल्या आहेत.
रमेश दुसे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.