अरुण रोडे
राज्यस्तरीय पुरस्कार
2025
अरुण रोडे हे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेत ४० वर्षे विविध पदांवर सेवा देऊन निवृत्त झाले. त्यानंतर २००४ पासून पुण्यातील ६ बँकिंग को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजेसमध्ये लेक्चरर म्हणून ते कार्यरत आहेत.
फेस्कॉम या संस्थेवर त्यांनी विविध पदांवर योगदान दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर, आर्थिक योजनांवर आणि उपयुक्त कायद्यांवर ४१ पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली आहे. नेरूळ, नवी मुंबई मुख्यालय आणि प्रादेशिक स्तरावर गावोगावी कार्यकर्ते तयार करण्यासाठी १०० हून अधिक प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. सर्व प्रादेशिक विभागांत मोफत कायदेविषयक सल्ला केंद्रे स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण कायदा २००७ अंतर्गत पीडित, वंचित, शोषित ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. २०१५ पासून मंत्रालयातील ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कृती समितीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पुण्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत.
२०२० पासून यशदा येथील डीटीडीसीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गात लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत. पुण्यातील कुसुमाग्रज कट्ट्यावर उपाध्यक्ष म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर यांचे साहित्य जनमानसात पोहोचवण्याचे काम करतात. ७५ साहित्यिक सदस्यांसह विविध उपक्रम ते राबवतात. गेल्या १० वर्षांपासून "प्रादेशिक वार्तापत्र पुणे"चे अरुण रोडे हे संपादक आहेत. "चांदण्यांची अक्षरे", "गगनगंध", "सोनं कवडसे", "चंद्रझुला" हे कवितासंग्रह यासह अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. विविध मासिकांमधून, स्मरणिकांमधून ज्येष्ठ नागरिक चळवळीवर १०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.
अरुण रोडे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.