रेखा रवींद्र बागुल
राज्यस्तरीय पुरस्कार
2023
समविचारी सहकाऱ्यांना घेऊन रेखा बागुल यांनी १९८२ रोजी डोंबिवली मध्ये कर्णबधिरांसाठी शाळा २ चालू केली. पुढे त्याचे अस्तित्व या संस्थेत विलीन करण्यात आले. त्या शाळेत रेखा यांनी प्राचार्यपदावर काम केले. तसेच दापोलीतील इंदिराबाई बडे कर्णबधिर विद्यालयात त्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.
रेखा ताईंनी १९९२ मध्ये घरातच "नचिकेत वाचा श्रवण प्रशिक्षण केंद्र" सुरू केले. आजतागायत ते केंद्र चालू आहे. या केंद्रात उत्तम भाषा आणि इतर विषयांची चांगली तयारी त्या करून घेतात. त्यामुळे सामान्य मुलांच्या शाळेत शिकून ही कर्णबधिर मुले आज वेगवेगळ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
रेखा बागुल यांनी कै. गणेश दातार वृद्धाश्रमाची स्थापना केली. यामध्ये ३० ज्येष्ठ नागरिक आपले छंद जोपासत आयुष्य घालवत आहेत. या वृद्धाश्रमावर रेखा बागुल यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्या म्हणतात, "दापोली सारख्या ग्रामीण भागात देखील वृध्दाश्रमाची गरज भासणे, हे दुर्दैवच ! कोणत्याच ज्येष्ठावर अशी वेळ येऊ नये आणि कोणी वेळ आणू देखील नये."
कौटुंबिक हिंसाचारामुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मिळेल ती मदत आणि लागेल तो आधार देण्याचे काम देखील रेखा बागुल करत असतात. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे.
गेली ४२ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रेखा बागुल यांची लवकरच फिफ्टी व्हावी, या सदीच्छा !
रेखा बागुल यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.