डॉ. श्रीरंग कद्रेकर

राज्यस्तरीय पुरस्कार
2023

सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख ते कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असा प्रवास केलेले श्रीरंग कद्रेकर, आपल्या अनुभवांच्या जोरावर अनेक समाजोपयोगी कामे करत आहेत. वय वर्ष ९४ होऊन देखील त्यांचा कामाचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे.

कृषी क्षेत्राची त्यांना खूपच आवड असल्यामुळे स्थानिक तरुणांना एकत्र घेऊन मातृवृक्ष जोपासण्यासाठी कलमे बांधणीची प्रशिक्षण वर्ग त्यांनी सुरू केला. आजपर्यंत त्यांनी अनेक शेती विषयक व्याख्याने, कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन त्यांच्या मार्फत आधुनिक शेतीचे तंत्र खेड्यात पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गावागावातून कृषी विकास युवक मंडळे स्थापन केली. यासह त्यांना साहित्याची देखील आवड आहे. "लाल मातीत रंगलो मी" या त्यांच्या आत्मचरित्रात कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

विद्यार्थ्यांसाठी गणपती विसर्जनावेळी नदी, ओढे तसेच समुद्रावर निर्माल्य संकलन व त्याचे गांडूळ खतामध्ये परिवर्तन, वृक्ष लागवड, ओढ्‌यावर वनराई बंधारे बांधणे, पर्यावरण प्रबोधन कार्यक्रम अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे आयोजित केली.

तरूणांमध्ये कृषी विषयक जागृती निर्माण करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम श्रीरंग कद्रेकर करत आहेत. खऱ्या अर्थाने पर्यावरणीय विकासाचा पाया खेडेगावातून रचण्यात येतोय, हे नमूद करावे लागेल.

श्रीरंग कद्रेकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.