मीनल मतीमनोहर ठाकोर

राज्यस्तरीय पुरस्कार
कल्याण
2023

मूळच्या कल्याण येथील रहिवासी असलेल्या मीनल ठाकोर यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून मास्टर इन सोशल वर्क केले. तसेच त्या सुगम संगीत विशारद देखील आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जेजे हॉस्पिटल येथे "मेडिकल सोशल वर्कर" म्हणून काम पाहिले. जवळपास ३५ वर्षे त्यांनी सेवा दिली आणि सेवानिवृत्त झाल्या. परंतु त्यांच्यातील सामाजिक जाणीव त्यांना शांत बसू देत नव्हती. या ना त्या प्रकारे त्यांनी सामाजिक कार्य चालूच ठेवले.

वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिक मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावेत, त्यांनी छंद जोपासावेत, आत्मकेंद्री ज्येष्ठांना बोलते करणे यासाठी मीनल ठाकोर नेहमी समुपदेशन करतात. ज्येष्ठांसाठी सरकारी योजना, कायदे, यांसाठी जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करणे. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षुकी देखील रोखण्याचा प्रयत्न केला आहे. Work for cause and not applause हे ब्रीद त्यांनी कायम जोपासले आहे.

त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कार्याचा यथोचित सन्मान वेळोवेळी झाला आहे. प्लॅन इंडिया दिल्लीचा नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. "आजी आजोबांचे घर" ही त्यांची अनोखी संकल्पना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, या सदिच्छा...!

मीनल ठाकोर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला "यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार" देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.