किशोर भागवत यांनी त्यांच्या २१ वर्षांच्या सेवाकाळात बीड जिल्ह्यातील गावंदरा आणि बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केले आहे. गावंदरा येथे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी त्यांनी सोलर ॲम्प्लिफायर, ओपन यार्ड, बालोद्यान, बालवाचनालय, ई-लर्निंग, आयएसओ मानांकन, शब्दांकुर आणि स्वरांकुर असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. परिणामी, शाळेतील अनेक मुले आज उच्च पदांवर पोहोचली आहेत.

२०१६ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड ता. खामगाव येथे बदली झाल्यानंतर मजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या मुलांसाठी त्यांनी ॲलेक्सा, अल्फाबेट रॅक, लेटर कॅप्स, ऑनेस्टी बॉक्स, टॅप व्हिसल, उच्चारावरून उजळणी, आकारानुसार अक्षरगट मांडणी, स्काईपद्वारे परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद आणि एआर/व्हीआरचा वापर असे क्रांतिकारी उपक्रम सुरू केले. लोकसहभागातून शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय परसबाग, ई-लर्निंग वर्ग, आरओ वॉटर, बोलक्या भिंती आणि सीसीटीव्ही अशा सुविधा निर्माण केल्या. संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा या सरकारी योजना आपल्या शाळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना 'अल्फाबेट रॅक ' या उपक्रमासाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ प्राप्त झाली आहे. आज शाळेची पटसंख्या २९४ असून, यावर्षी २१ मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून परत आली आहेत.

NIEPA ने हिवरखेड शाळेची केस स्टडी निवडली, SCERT ने ऑनेस्टी बॉक्सला यशोगाथेत स्थान दिले, तर "असा मी: कसा मी?" उपक्रमाला श्री अरबिंदो सोसायटीच्या टीचर इनोव्हेशन अवॉर्डसाठी निवड झाली. ते Microsoft Innovative Educator (MIE) एक्सपर्ट आहेत, त्यांच्या इंग्रजी कविता कॅनडात प्रकाशित झाल्या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांची निवड झाली. कोविड काळात 'टीच-ट्यूबर' चळवळ उभी करून ऑनलाइन शिक्षणाला चालना दिली, तर लसीकरण आणि १००% मतदान जनजागृतीसाठी वासुदेवाची भूमिका साकारून त्यांनी जनजागृती केली.

एक प्रयोगशील शिक्षक किशोर भागवत यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंचचा "डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार" देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी