गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील ‘लोक बिरादरी आश्रम शाळा’ ही आदिवासी माडिया समाजातील मुलांसाठी शिक्षणाचा दिवा आहे. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या प्रेरणेने पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी सुरू केलेली ही शाळा ३६५ दिवस चालते, आणि येथे प्रवेशासाठी रांगा लागतात. सध्या पहिली ते बारावीपर्यंत ५३० विद्यार्थी आहेत.

या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका विजया किरमीरवार या दहा वर्षांपासून (२०१५ पासून) गणित विषय शिकवतात. विषयानुसार वर्गखोल्या ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत, त्या मुलांना व्यवहारिक ज्ञान देतात; जसे खरी कमाई, बाजार प्रात्यक्षिक, क्षेत्रभेट, गणित खेळ, कोडी, पाढे स्पर्धा, स्पर्धापरीक्षा वर्ग, आणि दप्तर मुक्त शनिवार. याशिवाय वृक्षारोपण, वर्ग मंत्रिमंडळ, शैक्षणिक सहल, दिवाळी-उन्हाळी अभ्यास, पालक संपर्क सभा यांसारखे उपक्रम राबवतात.

कोविड काळात नेटवर्क नसतानाही गावोगाव जाऊन गाणी, गोष्टी यांचा उपयोग करून मुलांच्या अभ्यासात खंड पडू दिला नाही. गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनावणे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील शिक्षकांना गणित संबोध प्रशिक्षण दिले, आणि महिला दिनी किशोरींना गुड टच-बॅड टच प्रशिक्षण त्यांनी दिले. शाळेत ग्रंथालय, मैदान, जिम, मल्लखांब, टेबल टेनिस, चित्रकला वर्ग, आणि गरजूंसाठी मोफत नीट वर्ग आहेत. दरवर्षी डिसेंबरमध्ये वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. विजया यांच्या नेतृत्वात २०२३-२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ या स्पर्धेत शाळेस जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे.

विजया यांना आदिवासी अप्पर आयुक्त यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार, इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड, आणि शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

विजया किरमीरवार यांच्या अतुलनीय सेवाभावी कार्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंचचा "डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार" देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

वीडियो गॅलरी