यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'चा फेलोशीप प्रदान सोहळा आदरणीय शरद पवार साहेब, डॉ. अनिल काकोडकर, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आदरणीय पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने १२ डिसेंबर २०२१ साली या फेलोशीप'ची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात करण्यात आली.
याअंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर), साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती चे राजेंद्रदादा पवार आणि प्रोफेसर निलेश नलावडे व सह्याद्री फार्म्स नाशिकचे विलास शिंदे तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा.डॉ. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत. या फेलोशिपला तिसऱ्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला.
तिसऱ्या बॅचसाठी निवड समितीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार साहित्य फेलोशिप' साठी १२ व शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन साठी ४० अशा एकूण १३२ फेलोंची निवड केली आहे. या सर्वाना आज आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डाॅ. अनिल काकोडकर, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अजित जावकर, डाॅ. शंकरराव मगर, एस. एन पुरी, डाॅ प्रशांत पाटील, एमकेसीएल चे चीफ मेंटॉर विवेक सावंत, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ निलेश नलावडे, विलास शिंदे, प्रा.डॉ. नितीन रिंढे, चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले, नरेंद्र मुरकुंभी, फेलोशिपच्या सल्लागार समिती व निवड समितीचे सदस्य, चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, तिन्ही वर्षीचे फेलोज् व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.