'यशवंतराव चव्हाण सेंटरच्या' वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने संतविचारांवर आधारीत 'अभंगपट' हा लघुपट महोत्सव भरविण्यात येत आहे. यावर्षी संत तुकाराम महाराज यांच्या 'जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले' हा अभंग विषय म्हणून निवडला आहे. या विषयावर आधारीत लघुपट पाठविण्याची मुदत यापूर्वी १८ एप्रिल २०२२ होती पण लोकाग्रहास्तव ती १८ जुन २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लघुपट.

अभंगपट : Short Film Festival

विषयाबाबत माहिती

जे का रंजले गांजले ।

त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा ।

देव तेथें चि जाणावा ॥२॥

मृदु सबाह्य नवनीत ।

तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥

ज्यासि अपंगिता नाही ।

त्यासि धरी जो हृदयी ॥४॥

दया करणें जें पुत्रासी ।

ते चि दासा आणि दासी ॥५॥

तुका म्हणे सांगू किती ।

त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥६॥

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण यावर्षीच्या अभंगपट शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी विषय म्हणून निवडला आहे. या अभंगावर ( विषयावर ) आधारीत तीन मिनिटांची ( तीन मिनीटांपेक्षा जास्त नको कमी असेल तरी चालेल ) फिल्म आपल्याला 18 जूनपर्यंत तयार करुन पाठवायची आहे.

विषय विवेचन :

संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून एकप्रकारे देव, संत आणि माणुसकीची व्याख्याच केलेली आहे. देव कोणाला म्हणावे तर जो अडल्या-नडल्यांना, रंजल्या-गांजल्यांना, गोरगरीब- कष्टकऱ्यांना मदत करतो. अडचणीत सापडलेल्या गरजू माणसाला मदत करणारा माणूस हाच खरा देव ! असा विचार संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगातून मांडतात.

- कोरोना महामारीच्या काळात असे अनेक मानवरुपी देव अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करायला पुढे आले.

- आदिवासी पाडे, वाड्या-वस्त्यांवर शिक्षण पोहचावे, त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून झटणारे हात म्हणजे देवाचेच हात.

- दुष्काळी भागात पाणीप्रश्नावर काम करणारे किंवा अशा अनेक सामाजिक प्रश्नांवर लाखो लोकांसाठी राबणारी माणसं हेच खरे साधू संत.

- पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात जो माणूस दुसऱ्या माणसासोबत वागताना कसलाही भेद करत नाही, अगदी आपल्या नोकरांना देखील मुलांप्रमाणे वागवतो तो जणू भगवंताची मुर्ती असतो.

- संत गाडगे महाराजांसारखे संत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकशिक्षणासाठी खर्ची केल, शिक्षणाचे, स्वच्छतेचे महत्व आपल्या किर्तनातून जनसामान्यांना पटवून दिले.

थोडक्यात काय तर,

संत तुकाराम महाराज आपल्याला आपल्या सभोवतालचे खरे देव- साधु-संत शोधण्याची कसोटी सांगतात. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचाच धागा पकडून आपणही आपल्या फिल्मच्या माध्यमातून समाजाला नवी दृष्टी द्याल, ही अपेक्षा...! चला तर मग, त्वरा करा आणि आपली फिल्म तयार करुन या महोत्सवात सामील व्हा.