यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार यावर्षीपासून सुरु करण्यात आले. या वर्षांपासून एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिला राज्यस्तरीय डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार पुणे येथील बाळासाहेब घोडे आणि वर्धा येथील दिपाली सावंत यांना देण्यात येणार आहे. बाळासाहेब घोडे जि.प. प्राथमिक शाळा शिवनगर (डोंगरगण), ता. शिरूर, जि. पुणे येथे तर दीपाली सावंत या जि.प.प्राथमिक शाळा शेकापूर (बाई), ता. हिंगणघाट जि.वर्धा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. येत्या २६ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थिती हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

बाळासाहेब घोडे यांनी शिवनगर सारख्या छोट्याश्या वस्तीवरील शाळेला सृजनशील प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावली. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला आहे. जी मुले शाळेत येत नव्हती, पालकही यासाठी आग्रही नव्हते. यासाठी त्यांनी पालकांना शाळेचे महत्त्व पटवून दिले. अतिशय कमी पट असणाऱ्या शाळेचा पट आता दोन अंकी झाला आहे. शाळेची इमारत लोकवर्गणीतून उभी करून भवताल पर्यावरणस्नेही केल्याने शाळेतील वातावरण आनंददायी झाले आहे. मुले ही शाळेत बसली नसून बागेत बसली आहे असा अनुभव शाळेला भेट दिल्यानंतर येतो. गुणवत्तेच्या दृष्टिनेही ही शाळा जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे. ही शाळा सहजशिक्षणाचे एक केंद्र तयार झाले आहे. या शाळेला भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार देखील मिळाला आहे ही बाब उल्लेखनीय वाटते.

दिपाली सावंत या वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपक्रमशील शिक्षिका म्हणून शिक्षणक्षेत्रात परिचित आहेत. त्यांनी दुर्गम अशा पारधी पाड्यातील मुलांना नियमित शाळेत आणण्यासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे . शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न करून सोबतच शाळेमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या शिकण्यासाठी आपली धडपड केल्याने ही मुले शाळेत आली, टिकली आणि शिकत आहेत. याचा अनुभव त्यांच्या शाळेला भेट दिल्यावर येतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात.कोविडकाळात मुलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य आणि राज्यस्तरावर त्यांच्या नवोपक्रमांची नोंद ह्या बाबीही सर्वाना प्रेरणादायी आहेत. वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.मूलोद्योगी शिक्षणाची संकल्पना वर्धा जिल्ह्यातून शिक्षणक्षेत्राला मिळालेली आहे. त्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांना 'शिक्षणातून स्वावलंबी' बनविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमधून दिसून येतात.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे, दत्ता बाळसराफ, दिप्ती नाखले यांनी त्यांचे अभिनंदन केले.