यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कार सुरु करण्यात आले. यावर्षीच्या म्हणजे दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी केली असून विविध क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम दि २२ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास आदरणीय शरद पवार साहेब, ज्येष्ठ कवी, लेखक जावेद अख्तर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामान्य स्त्रिया संकटांशी दोन हात करत आपले ध्येय कसे गाठतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कशा प्रगतिपथावर आणतात, हे अनुभवण्याचा हा सोहळा आहे. सन १९९४ साली जाहीर झालेल्या महिला धोरणाला यंदा २९ वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता व क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आम्हाला ‘यशस्विनी’ मिळाल्या आहेत. विविध विषयांवर कथा, कादंबरी यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या डॉ. सुनिता बोर्डे (सांगली)यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', संपूर्ण सेंद्रिय खतांचा उपयोग करून शेती पिकवणाऱ्या भारती नागेश स्वामी (कराड, सातारा) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान',आपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लक्ष्मी नारायणन (पुणे) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या शर्मिला प्रभाकर कलगुटकर (ठाणे) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या राजश्री पाटील (नांदेड) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान', कबड्डी खेळाडू व आता प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या शैलजा जैनेंद्रकुमार जैन (नाशिक) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
या सर्व महिला “यशस्विनी सन्मान पुरस्कारा” च्या मानकरी ठरल्या आहेत. या सर्व यशस्विनींचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. त्यांचा गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.